श्रीगोंद्यामध्ये 82 हजारांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त | पुढारी

श्रीगोंद्यामध्ये 82 हजारांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : शहरातील रोकडोबा चौकात गुटखा विक्री करणार्‍यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी कारवाई करत 81 हजार 310 रुपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखू आणि एक हजार रूपये रोख, असा एकूण 82 हजार 310 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुटखा विक्री करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. एक जण अंधाराचा फायदा घेत पसार झाला. रवि बबन दळवी (रा. रोकडोबा चौक, श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना श्रीगोंदा शहरातील रोकडोबा चौकातील एका गाळ्यात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्री होत असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी याबाबत श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिस नाईक सचिन आडबल, विशाल गवांदे आणि पोलिस कॉन्सटेबल रोहित मिसाळ यांना सूचना देत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस कर्मचार्‍यांनी शहरातील रोकडोबा चौक येथे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जाऊन खात्री केली असता आरोपीच्या घराशेजारील गाळ्यात दोन इसम गुटख्याची विक्री करताना दिसले. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत विमल, आरएमडी गुटखा असा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला 81 हजार 310 रूपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखू, एक हजार रूपये रोख, असा 82 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Back to top button