नगर : तीन वाहनांच्या धडकेत एक ठार | पुढारी

नगर : तीन वाहनांच्या धडकेत एक ठार

काष्टी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : नगर-दौंड महामार्गावर निमगाव खलू (ता.श्रीगोंदा) येथे भीमा नदीच्या पुलावर टेम्पो, लहान मालवाहू मोटार (छोटा हत्ती), आणि कार या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. बुधवारी (दि. 10) दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. चैतन्य पिंटू बिटके (रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) असे मृत तरुणाचे नाव असून जखमींची नावे समजली नाहीत.

दौंडकडून नगरकडे भरधाव जाणार्‍या टेम्पोची (एमएच 46 बीयू 1636) समोरून येणार्‍या छोट्या मालवाहू वाहनाला (एमएच 16 सीसी 1506) जोराची धडक बसली. त्याचवेळी टेम्पोच्या मागून जात असलेली कार (एमएच 12 पीएच 8593) वेग आवरता न आल्याने टेम्पोवर धडकली. यात टेम्पोला समोरून धडकलेल्या छोट्या वाहनाचा चालक चैतन्य पिंटू बिटके याचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोचालक आणि कारमधील एक जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली होती. माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले व वाहतूक सुरळीत केली. मृत तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात नेल्याचे श्रीगोंदा पोलिसांनी सांगितले.

Back to top button