कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक फेरमतमोजणी सुनावणी लांबणीवर

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक फेरमतमोजणी सुनावणी लांबणीवर

कर्जत  : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक फेर मतमोजणी निकालाबाबत बुधवारी (दि.10) जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्यासमोर सुनावणी झालीच नाही. आता ही सुनावणी गुरूवारी (दि.11) होणार आहे. कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे पराभूत उमेदवार लीलावती जामदार व भरत पाहुणे यांनी सेवा सहकारी संस्थेच्या एका सर्वसाधारण जागेची व महिला प्रतिनिधीच्या एका जागेची फेर मतमोजणी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडे केली आहे. त्या अर्जावर 9 मे रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यावर वादी व प्रतिवादी यांचा युक्तिवाद जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्यासमोर झाला. मात्र, सर्व युक्तिवाद पूर्ण न झाल्यामुळे काल बुधवारी याबाबत पुढील सुनावणी त्यांच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आली होती.

मात्र, बुधवारी नगरमध्ये बँकांच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम असल्यामुळे व सहकार आयुक्त या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्यामुळे कर्जत बाजार समिती फेर मतमोजणीबाबत कोणतीही सुनावणी झाली नाही. ही सुनावणी गुरुवारी ठेवण्यात आली आहे.
कर्जत बाजार समितीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांना प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने या फेर मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तालुक्यातील इतर सभापती व उपसभापती निवडीच्या तारखा जाहीर झालेल्या असताना, कर्जत येथील सभापती निवडीची तारीख या सुनावणीमुळे अद्याप जाहीर झालेली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news