शिर्डीत सौर ऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती | पुढारी

शिर्डीत सौर ऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  2017-18 सालामध्ये मंजूर झालेल्या अमृत 1.0 अंतर्गत शिर्डी नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेच्या 500 किलो वॅट सौर ऊर्जा प्रकल्पातून अखेर वीज निर्मितीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, सौर ऊर्जा प्रकल्पातून नगरपरिषदेच्या वीज बिलातून सुमारे मासिक 5 लाख रुपयांची बचत होणार आहे. नगर जिल्ह्यातील मोठ्या क्षमतेचा हा केवळ एकमेव प्रकल्प असून, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प मागील उन्हाळ्यामध्ये सुरु होऊ शकला नाही, परंतु शिर्डी नगरपरिषदेने आटोकाट प्रयत्न करून प्रकल्प अखेर सुरू केला.

शिर्डी शहर सोलर सिटी करण्याचा मानस पालकमंत्री विखे व खा. डॉ. सुजय विखे यांचा आहे. या वाटचालीचे हे पहिले पाऊल मानले जाते. शिर्डी नगरपरिषदेस दरमहा 15 लाख रुपये वीज बिलापोटी वीज वितरण कंपनीस भरावे लागतात. वीज बिलाचा मोठा बोजा कमी करून वीज निर्मितीबाबत शिर्डी शहर विजेसाठी स्वावलंबी करण्याकरिता नगरपरिषदेने शासनाच्या विविध योजनांमधून सौर प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले.

महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान 1.0 व 2.0’ अंतर्गत प्राप्त बक्षीस रकमेतून 440 किलो वॅट सौर प्रकल्प उभारण्यात येत आहेत. अमृत 2.0 अभियानांतर्गत शिर्डी शहर भूमीगत गटार योजना टप्पा क्र.2 या प्रकल्पातील 500 किलो वॅट सौर ऊर्जा प्रकल्प आगामी 1 वर्षात उभारण्यात येणार आहेत. यामधून सुमारे 10 ते 12 लाख रुपयांच्या विजेची बचत होणार आहे. या बचतीमुळे वीज वितरण कंपनीस भरावे लागणार्‍या वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होऊन बचत निधी नगरपरिषदेच्या इतर महत्त्वाच्या विकास कामांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली.

शिर्डी नगरपरिषदेचा नवा आदर्श
शिर्डी नगरपरिषदेने पर्यावरण रक्षणासाठी अशा प्रकारचे सौर वीज प्रकल्प उभारून राज्यातील नगरपरिषदांसह शासकीय कार्यालयांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

 

Back to top button