नगर: पाणी ओतून कचर्‍याचे वजन ; महासभेत नगरसेवकांचा आरोप, चार दिवसांनी येते कचरागाडी | पुढारी

नगर: पाणी ओतून कचर्‍याचे वजन ; महासभेत नगरसेवकांचा आरोप, चार दिवसांनी येते कचरागाडी

नगर : पुढारी वृत्तसेवा : कचरा संकलनाचा ठेका गुजरातच्या संस्थेला दिल्यापासून शहरातील कचरा संकलनाचा बोजवारा उडाला आहे. चार ते पाच दिवस प्रभागात कचरागाडी येत नाही. रस्त्यावर कचर्‍याचे ढीग साचले आहेत. शंभर टक्के कचरा संकलन होत नाही. तरी कागदोपत्री कचरा संकलन दाखविले जात आहे. केवळ वजन वाढविण्यासाठी पाणी ओतून कचर्‍याचे वजन केले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. तर, प्रशासनाकडून ठेकेदारांची पाठराखण होत असल्याचे दिसून आले. दरम्यान कचरा गाड्यांना दहा दिवसांत जीपीएस बसविणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसचिव एस. बी. तडवी यांच्यासह सभागृहात विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभापती गणेश कवडे, नगरसेवक कुमार वाकळे, स्वप्नील शिंदे, श्याम नळकांडे, बाबासाहेब वाकळे, नगरसेविका दीपाली बारस्कर, रूपाली वारे, मालन ढोणे आदी उपस्थित होते.

शहरातील कचरा संकलनाच्या विषयावर नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. शहरात दररोज कचरा संकलन होत नाही. चार ते पाच दिवस कचरागाडी येत नाही. कचर्‍याच्या गाडीसाठी फोन करावा लागतो. मग घरात किती दिवस कचरा ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होतो. उपनगरांमध्ये जागोजागी कचर्‍याचे ढीग साचले आहे. ओला-सुका कचर्‍याचे विलगीकरण होत नाही. महापालिकेला मानांकन मिळाले ते असा प्रश्न उपस्थित होत आहे, असा सवाल नगरसेवक कुमार वाकळे, डॉ. सागर बोरूडे, सचिन शिंदे, स्वप्नील शिंदे यांनी उपस्थित केला.

त्यावर उपायुक्त यशवंत डांगे म्हणाले, कचरा संकलनासाठी नवीन एजन्सी नेमली आहे. त्याच्याकडे वाहन कमी होत आता साधारण 62 वाहने आहेत. संकलनाचे नियोजन प्रभावीपणे होत नाही. त्यांच्या अंतर्गत व्यवस्थापनामध्ये अडचण असेल. त्या वेळी उपायुक्त डांगे ठेकेदारांचे समर्थन करीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले, की उद्या ठेकेदार व अधिकार्‍यांची बैठक घेऊन पूर्ण क्षमतेने कचरा संकलन करण्याच्या सूचना देण्यात येतील. कचरा संकलन न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तर, दहा दिवसांत कचरा गाड्यांवर जीपीएस सिस्टीम बसविण्यात येईल.

ठेकेदाराला पाठीशी घालू नका
शहरात सर्वत्र कचर्‍याचे ढीग साचले आहेत. रस्त्यावर जागोजागी कचरा साचला आहे. शंभर टक्के संकलन होत नसले तरी कागदोपत्री सगळी प्रक्रिया होत आहे. त्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी. त्याला अधिकार्‍यांनी पाठीशी घालू नये. दिवसभरात किती कचरा संकलन होते याचा तपशील नगरसेवकांना समजण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये समावेश करावा, असे नगरसेवक कुमार वाकळे म्हणाले.

अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी
महासभेला सर्वच प्रमुख विभागाचे अधिकारी गैरहजर होते. आरोग्य विभागप्रमुख डॉ. अनिल बोरगे, अतिक्रमण विभागप्रमुख उपअभियंता सुरेश इथापे, घनकचरा विभागप्रमुख किशोर देशमुख, विद्युत विभागप्रमुख अभियंता जोशी अनुपस्थित होते. त्यामुळे नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास अधिकारी नव्हते. त्या वेळी गैरहजर अधिकार्‍यांवर कारवाई करा, अशी मागणी सर्वच नगरसेवकांनी केली. त्यावर आयुक्तांनी कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

‘अमृत’वर थेट कनेक्शनसाठी स्वतंत्र बैठक
जुन्या मुख्य जलवाहिनीवरील थेट कनेक्शन बंद करावे, अमृत योजनेवर कोणालाही थेट कनेक्शन देऊ नये, याबाबत ठराव घेण्यासाठी महासभेत विषय घेण्यात आला होता. शिवसेना (ठाकरे गट)च्या नगरसेवकांनी तसे पत्र दिले होते. त्यावर सभागृहात चर्चा झाली. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर म्हणाले, अमृत योजना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्यासह सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केले. जलवाहिनी वडगाव गुप्ता-आठरे पाटील शाळा, तपोवन रोड परिसरातून नेल्याने मनपाचा खर्च वाचला. त्यासाठी आम्ही जमिनी दिल्या. त्यामुळे त्या परिसराला पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यावर महापौर रोहिणी शेंडगे यांनी नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

भाजप-सेना (ठाकरे गट) भिडले
भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर केडगाव उपनगरातील समस्यांबाबत सभागृहात बोलत असताना शिवसेना (ठाकरे गट)चे नगरसेवक सचिन शिंदे यांनी अजेंड्यावरील विषय घ्या असे म्हणून विषय बदलण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मनोज कोतकर यांच्या लक्षात आल्यानंतर ‘मला बोलू द्या मग विषय घ्या‘ असे ते म्हणाले. त्यावरून दोघांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. प्रकरण थेट एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत गेले. यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभापती गणेश कवडे, कुमार वाकळे, श्याम नळकांडे यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला.

Back to top button