बस बंद पडण्याचा सिलसिला ; करंजी परिसरात तीन बस बंद | पुढारी

बस बंद पडण्याचा सिलसिला ; करंजी परिसरात तीन बस बंद

करंजी : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी आगाराच्या सर्वच बस नादुरुस्त असल्याचे आज पुन्हा एकदा समोर आले आहे. करंजी परिसरात तीन बस बंद पडल्याने प्रवाशंना नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याला मिळालेल्या 40 पैकी 30 बस या उत्तरेकडे दिल्या आहेत. किमान प्रत्येक डेपोला तीन याप्रमाणे या बस दिल्या पाहिजे होत्या अशी चर्चा आता रंगू लागली आहे. पाथर्डी आगाराच्या बस बंद पडण्याच सिलसिला सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर- पाथर्डी मार्गावरील करंजी घाटात तांत्रिक बिघाडाने रस्त्यात एसटी बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, या प्रकाराबद्दल प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, पाथर्डी आगारा भंगारात काढण्याची वेळ आली असल्याचे काही प्रवाशांचे म्हणने होते. या विरोधात पाथर्डीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बसची दुरुस्ती, सब वेळेवर सोडण्याची मागणी, तसेच विविध सुविधा देण्याची मागणी करत आंदोलन केले होते. यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी आंदोलकांशी चर्चा करुन त्यांच्या मागण्या मान्या केल्या होत्या. तसेच, नवीन बससाठी प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात आले होते. आता, या बसची प्रतिक्षा पाथर्डी करांना आहे.

मंगळवारी करंजी घाटात एक नव्हे तर तीन बस ठिकठिकाणी काही तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. पाथर्डी आगाराच्या अनेक एसटी बस तालुक्यात प्रवासी वाहतूक करताना रस्त्यात बंद पडलेच्या आढळून येतात त्यामुळे एसटी बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. करंजी घाटात अशीच एक एसटी बस क्लसपेट खराब झाली, म्हणून बंद पडली. त्यानंतर अनेक प्रवासी पर्यायी बसने पुढच्या प्रवासाला निघून गेले.

मात्र, काही महिला प्रवाशांना बसची व्यवस्था न झाल्याने त्यांना करंजी घाटातील कठड्यावरच बराच वेळ बसून राहण्याची वेळ आली.
एकंदरीतच सातत्याने बिघडणार्‍या एसटी बस व त्यामुळे प्रवाशाला होणारा मनस्ताप, याकडे एसटीच्या अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पाथर्डीचे सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी पाथर्डी एसटी आगाराच्या सातत्याने बिघडणार्‍या एसटी बससंदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

बस फेर्‍या रद्द करण्याची नामुष्की!
राज्यातील बहुतेक आगारातील बस नादुरुस्त असल्याने आगारांना काही बस फेर्‍या बंद करण्याची नामुष्की ओढावली असताना, पाथर्डी आगाराची आवास्थाही काही वेगळी नाही. पाथर्डी आगारातील काही बस फेर्‍या ऐनवेळी रद्द करण्यात येतात, याचा त्रास प्रवाशांना होतो. तर, अनेक बस रस्त्याच बंद पडत असल्याने प्रवाशांचा वेळ वाया जातोच तर, मनस्थापही सहन करावा लागतो.

‘दैनिक पुढारी’ने पाथर्डी आगारातील बस वारंवार बंद पडत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. यावृत्ताची आंदोलनस्थळी चांगलीच चर्चा झाली खरी, यावेळी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी आंदोलनाची दखल घेऊन बस तत्काळ दुरुस्त करण्यात येतील असे आश्वासन दिले होते; मात्र या आश्वासनाचे काय झाले? असा सवाल करंजी घाटात बंद पडलेल्या बसच्या प्रवास्यांनी उपस्थित केला आहे.

Back to top button