नगर : शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी जाधव | पुढारी

नगर : शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी जाधव

पुणतांबा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना प्रणित शेतकरी सेनेची नव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच स्थापना करून प्रदेशाध्यक्षपदी धनंजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांना विविध प्रश्नी न्याय मिळवून देण्यासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. दरम्यान पुणतांब्याच्या भुमीपुत्राला राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने पुणतांबा व परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सन 2017 मध्ये येथे पुकारण्यात आलेल्या शेतकरी संपाची देशपातळीवर तसेच राज्य सरकारने दखल घेऊन यामधील काही मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला होता. या संप काळात जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, यानंतर त्यांनी शेतकरी प्रश्नी विविध आंदोलने करून किसान क्रांतीच्या माध्यमातून काम सुरू ठेवलेले आहे.

मुंबईत नुकतीच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या स्थापनेची घोषणा करून प्रदेशाध्यक्षपदी जाधव तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नाथाभाऊ कराड व अन्य कार्यकारिणी जाहीर केली, या माध्यमातून शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर काम करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. यावेळी योगेश रायते, हंसराज बडघुले, सुधाकर जाधव, दत्ता सुराळकर, गणेश बनकर, सर्जेराव जाधव, अशोक धंनवटे, दत्तात्रय बोर्डे, योगेश ठाकरे, सोपान धंनवटे,मधु घोडेकर, चंदकांत वाटेकर, कृषीकन्या निकिता जाधव, नितीन सांबारे, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी सेनेच्या वतीने राज्य पातळीवर काम करण्याची जी संधी दिली. त्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रश्न समजावून ती सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाऊन झालेली निवड सर्वांच्या सहकार्याने सार्थ ठरविली जाईल, तसेच शेतकर्‍यांना शेतीमालाला हमी भाव, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
                                                   -धनंजय जाधव, शेतकरी सेना, प्रदेशाध्यक्ष

Back to top button