नगर : पठार भागातील रस्त्यांची झाली दैनावस्था | पुढारी

नगर : पठार भागातील रस्त्यांची झाली दैनावस्था

बोटा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांबूत ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांच्या माध्यमातून अनेक रस्त्यांची मंजूर कामे करण्यात आली. परंतु काही कामे निष्कृष्ठ दर्जाची झाली. तर काही रस्ते फक्त कागदोपत्री पूर्ण झाली आहेत. ‘आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय’ अशी परिस्थिती पठार भागात आहे. जांबुत गावच्या शिवारात जिल्हा परिषद व ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विविध रस्त्यांची मंजूर कामे करण्यास आली आहे. यात गाव ते वाडा वस्ती एक किलोमिटर रस्ता, शेंगाळवाडी ते हिवरगाव शिवरस्ता, जांबुत ते जांबुत खुर्द गावच्या पारनेर हद्दीपर्यंत पाच कि. मी. या रस्त्याचे काम निष्कृष्ठ दर्जाचे काम झाले आहे. तर मारुती मंदिर ते पासोडीवस्ती रस्ता काम कागदोपत्री झाले. परंतु काम झाल्यासारखे दिसत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे.

दरम्यान साकूर पठार भागात तसेच जांबुत गावच्या शिवारातील रस्त्यांची कामे आमदार, जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सरपंच यांच्या प्रयत्नातून रस्त्यांच्या कामांना विविध योजनां मधून भरघोस निधी मंजूर होत आहे. परंतु सबंधित ठेकेदार मात्र मलिदा लाटण्यासाठी निष्कृष्ठ दर्जाची कामे करीत विविध विकास कामांना चुना लावला जात असल्याची व्यथा येथील नागरिक व्यक्त करत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे झाली. परंतु सर्वच कामे निष्कृष्ठ दर्जाची कामे झाली आहेत. यात काही रस्ते फक्त कागदोपत्री पूर्ण झाले आहेत. खराब रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत पठार भागात अनेक आंदोलने झाली. परंतु ठेकेदारांनी सर्वच रस्त्यांच्या कामात मोठा मलिदा लाटला आहे.यातील काही ‘प्रसाद’ अधिकार्‍यांनीही चाखला आहे. त्यामुळे कोणी कितीही अवाज उठविला तरी अधिकारी त्यांना भीक घालीत नाहीत.

दोन महिन्यांपूर्वी मी उपसरपंच पदाची जबाबदारी स्विकारली आहे. गावातील चार ते पाच रस्त्यांना जवळ पास तीस ते चाळीस लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सडक योजना, जिल्हा परिषद अंतर्गत, ठक्कर बाप्पा योजनेतून अशा विविध योजनांमधून निधी आलेला होता.परंतु काही रस्त्यांवर डांबर कमी टाकले आहे. तर काही ठिकाणी फक्त खडीच टाकली आहे. काही रस्त्यांची कामेच झाली नाही. तर ते फक्त कागदावर पूर्ण झाली आहे. जि. प. तसेच आमदार यांनी या निधीच्या कामांची चौकशी करावी.
                                                      – सुभाष डोंगरे, उपसरपंच, जांबुत.

Back to top button