68 गोवंश वासरे कत्तलीतून मुक्त ! संगमनेर शहर पोलिस पथकाची कारवाई | पुढारी

68 गोवंश वासरे कत्तलीतून मुक्त ! संगमनेर शहर पोलिस पथकाची कारवाई

श्रीरामपूर(नगर); पुढारी वृत्तसेवा : कोल्हार- घोटी राज्य महामार्गावर सासरवाडी हॉटेलजवळ कत्तलीसाठी जाणारे सुमारे 1.36 लाख रुपये किमतीचे 68 गोवंश वासरे व 20 हजारांच्या गायीची संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने कत्तलीतून मुक्तता केली. शहरालगत समनापूर परिसरात हॉटेल सासुरवाडीजवळ काही गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली. स. पो. नि. विठ्ठल पवार यांना कारवाई करण्यास सांगितले.

पोलिस पथक सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घटनास्थळी गेले असता पत्र्याच्या शेडमध्ये अनेक जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधलेली दिसली. ही जनावरे कत्तलीतून मुक्त करून पोलिसांनी सायखिंडी येथील पांजरापोळा येथे पोहोचवली. याबाबत पो. ना. निलेश धादवड यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी रज्जाक शेख याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण 1976 चे सुधारीत कलम 5 (अ) 1, 9 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविल्याबद्दल 21 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो. नि. भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलिस करीत आहेत.

गोवंश कत्तलीचे प्रमाण वाढत असल्याने चिंता
संगमनेर शहरासह परिसरात खुलेआम बेकायदेशीर चालणार्‍या कत्त लखान्यांवर पोलिस सतत कारवाई करतात. काही कत्तल खान्यांच्या चालक- मालकांवर गुन्हा दाखल केले आहेत, मात्र त्यांना पकडत नाहीत. पकडले तरी जामीन मंजूर होतो. यामुळे वारंवार तेच ते कत्तलखान्यांचे चालक-मालक या गुन्ह्यात सापडतात. त्यांच्यावर तडाकाफडकी कडक कारवाई होत नाही. त्यामुळे गोवंश कत्तलीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे वास्तव समोर येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Back to top button