नेवासा : कांदा काढणी मजुरांअभावी लांबणीवर! | पुढारी

नेवासा : कांदा काढणी मजुरांअभावी लांबणीवर!

कैलास शिंदे

नेवासा(नगर) : शेतातील कांदा काढण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू असून, काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने व अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला. मजुरांअभावी कांदा काढणीचे काम लांबत आहे. घरातील लहान मोठ्यांची हजेरी शेतात कांदा काढणीसाठी लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू आहेे. एकीकडे कांद्याला भाव नाही. तो काढणीसाठी मजूर मिळत नाही. काढलेला कांदा घरापर्यंत आणण्यासाठी साधने नाहीत.

यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. कांदा लागवडीपासून ते कांदा काढणीपर्यंतचा अमाप खर्च करून कांदा पीक घेतले. सुरुवातीला हवामान कांद्याला पोषक असल्याने कांद्याचे पीक जोमदार आले. मात्र, ऐन काढणीच्या वेळी अवकाळीने शेतकर्‍यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. काढलेला कांदा भिजल्याने चाळीत किती दिवस टिकतो याची शाश्वती नाही. शेतकरी पैसा खर्च करून चाळी तयार करून कांद्याची साठवण करत आहेत. अनेकांचा कांदा पावसाने भिजल्याने तसाच शेतात पडून आहे. तर काहींनी काढलेला कांदा प्लास्टिक साहाय्याने झाकून ठेवला आहे.

दैनिक ‘पुढारी’मुळे महसूलला जाग, पंचनामे सुरू

नेवासा तालुक्यात अवकाळी पावसाने कांदा पिकाची वाट लागली आहे. मोठ्या प्रमाणात कांदा भिजून नुकसान झालेे. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले. शेतात जावून पंचनामे करताना महसूल कर्मचारी दिसत आहेत.

Back to top button