नगर : गुरुजींना निरोप देताना गाव रडले | पुढारी

नगर : गुरुजींना निरोप देताना गाव रडले

नगर; पुढारी वृत्त्तसेवा : अनेक वर्षे गावात राहिल्याने शिक्षकांचे गावाशी जवळचे नाते तयार होते. त्यात शाळेची गुणवत्ता वाढवून समाजाशी एकरूप झालेल्या शिक्षकांवर गाव मनापासून प्रेम करते. याचा प्रत्यय देणारी घटना नेवासा तालुक्यातील सजलपूर गावात घडली. जवळ जवळ एक तप गावात शिक्षक म्हणून नौकरी करणार्‍या बंडू जपकर या शिक्षकाची बदली झाली तेव्हा गाव हळहळले. गुरुजींची बदली रद्द करण्याचेही प्रयत्न झाले. पण गावकर्‍यांना त्यात यश आले नाही. शेवटी आपल्या लाडक्या गुरुजींना निरोप देण्याची जंगी तयारी करण्यात आली. गुरुजींची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

गावातील स्रियांनी गुरुजींसाठी घरासमोर रांगोळ्या काढल्या. अनेक भगिनींनी गुरुजींचे पाय पाण्याने धुवून जणू त्यांना त्यांच्या कार्याची पावती दिली. घराघरात गुरुजींचे सत्कार झाले. गावकर्‍यांच्या या प्रेमाने गुरुजी भारावून गेले. तब्बल बारा वर्षे सजलपूर येथे शिक्षक म्हणून सेवा बजावणार्‍या जपकर गुरुजींनी शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला.

गुणवत्ता वाढल्याने शेजारच्या गावातील मुलेही सजलपूरच्या जिल्हा परिषद शाळेत येऊ लागली. गुरुजींनी कधीच कुठल्या मुलांकडून परीक्षेची फी घेतली नाही. उलट अनेक गरीब मुलांना आर्थिक मदत केली. निरोप समारंभाच्या कार्यक्रमात जपकर गुरुजींनी शाळेतील चार गरीब मुले दत्तक घेऊन गावाविषयी ऋण व्यक्त केले. गुरुजींना निरोप देताना गावातील मुलांबरोबरच सर्व आबालवृद्ध हजर होते.

या अनोख्या निरोप समारंभाची परिसरात चांगलीच चर्चा आहे. यावेळेस संपन्न झालेल्या कृतज्ञता सोहळ्यास प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षकनेते डॉ.संजय कळमकर, सरपंच बंडू जगताप, सुदर्शन शिंदे, राजेंद्र ठाणगे, भास्कर नरसाळे, देविदास जगताप, संतोष कसबे, जालिंदर मकासरे, मुक्ताजी जगताप, संदीप डोईफोडे, बाळासाहेब फोपसे, भाऊसाहेब काकडे आदि हजर होते.

एखाद्या गावाचे गुरुजींवर इतके प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. ही घटना समस्त शिक्षक वर्गाच्या प्रतिष्ठेत भर घालणारी आहे. जपकर गुरुजींनी निरोप घेतानाही चार गरीब मुले दत्तक घेऊन गावाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. समाज व गावाचे इतके घट्ट नाते निर्माण होते तेव्हा मुलांच्या गुणवत्तेला आपोआप चालना मिळते. जपकर गुरुजींचा आम्हाला अभिमान वाटतो.

                      -डॉ.संजय कळमकर शिक्षकनेते, साहित्यिक

Back to top button