सोनई : गडाखांसाठी खुशी; तर मुरकुटेंसाठी गम..! बाजार समितीत विक्रमी मताधिक्य | पुढारी

सोनई : गडाखांसाठी खुशी; तर मुरकुटेंसाठी गम..! बाजार समितीत विक्रमी मताधिक्य

सोनई(नगर); पुढारी वृत्त्तसेवा : मागील बाजार समितीच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत आमदार गडाख यांचे मताधिक्य वाढल्याने सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा आमदार गडाख यांच्या बाजूने भक्कमपणे उभी राहिल्याचे दिसले. तर माजी आमदार मुरकुटे व लंघे यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ताकद दिली, मेळावा घेतला तरी नेवासा तालुक्यातील मतदारांनी त्यांना साफ नाकारल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आगामी राजकारणात मुरकुटे, लंघे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा तालुक्यात रंगलेली आहे.

आमदार शंकरराव गडाख यांनी या निवडणुकीत खूप नवीन फंडा आणला, कारण जिल्ह्यात व राज्यात मतदारांना सहली, जादूचे प्रयोग असे वेगवेगळे प्रकार झाले. पण गडाख यांनी कुठेही मोठे मेळावे, प्रचार फेर्‍या केल्या नाही, तर मतदार यांच्याशी डायरेक्ट संपर्क केला.
जुन्या व धनधांडग्या लोकांना उमेदवारी न देता सर्वसामान्य लोकांना उमेदवारी दिली. अगदी छोट्या गावातून उमेदवार पुढे केले, सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिले, गावातील राजकीय वैर मिटवले, ज्यांना उमेदवारी दिली, त्यांनी गावात ग्रामपंचायत, सोसायटी यात दुसर्‍यांना संधी देऊन गावात राजकीय हस्तक्षेप करू नये, याचा शब्दच घेतला व निवडून आल्यावर संघटना बांधावी असेही सांगितले.

आमदार गडाख यांच्यावर खूप नाराजी असून त्यांना जनता धक्का देईल अशी चर्चा विरोधकानीं केली. गडाख यांचे प्रमुख कार्यकर्ते नाराज आहे असेही बोलले गेले. त्यांच्यावर विविध आरोपही केले गेले, परंतु आमदार गडाख यांनी याकडे दुर्लक्ष केले व सामान्य मतदार यांच्याशी वन टू वन चर्चा केली. व्यवस्थित प्लॅनिंग केले अगदी निवडणूक काळात गडाख हे तालुक्यात सांत्वन भेटी, लग्न तसेच तालुक्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावतांना दिसले. त्यांनी कुठेही मोठे मेळावे घेतले नाही, शिवाय पदयात्रा, प्रचारफेरी याला फाटा त्यांनी दिला.

दरम्यान, गडाख यांच्यावर नाराजी आहे, असे अगदी त्यांच्या कार्यकर्त्यांत चर्चा झाली, पण गेल्या काही वर्षांपासून त्यांनी गाव पुढारी यांना जवळ ठेवलेच, शिवाय सामान्य लोकांशी थेट संपर्क करण्याची हाती घेतलेली मोहीम यशस्वी झाली. लंघे, मुरकुटे यांनी प्रस्थापित लोकांना उमेदवारी दिली, तर गडाख यांनी जनतेतील अगदी सामान्य लोकांना उमेदवारी देऊन यश संपादन केल्याने या निकालाची मोठी चर्चा सुरू आहे.

पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका असल्याने ही विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिली गेली. भाजपच्या उमेदवारीवरून लंघे व मुरकुटे यांच्यात मोठी रस्सीखेच आहे तर गडाख हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे निश्तिच आहे. माजी आमदार मुरकुटे यांची पकड कमी झाल्याचे दिसून येत आहे, कारण भाजपची सत्ता येऊनही अनेकानीं गडाख गटात प्रवेश केला. त्यांच्या गावातील ग्रामपंचायत सदस्य, घरातील सदस्य व तालुक्यातील भाजपच्या मोठ्या लोकांनी गडाखांच्या तंबूत जाणे पसंद केले.

बाजार समितीच्या निवडणुकीत ज्याला व्यापारी मतदार संघात उमेदवारी दिली त्याने तर मतदानाच्या आधी चार दिवस तर आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत प्रवेश करून मुरकुटे यांना धक्का दिला. या घडामोडीचीही मोठी चर्चा भाजपच्या पदाधिकार्‍यांत झाली. त्यामुळे गडाखांकडे असलेला जनतेचा कौल भाजपला चिंता करायला लावणारा आहे.

Back to top button