नऊ डेपोंवर विकली जाणार शासकीय वाळू; कर्जतमधील नागापुरातही डेपो प्रस्तावित | पुढारी

नऊ डेपोंवर विकली जाणार शासकीय वाळू; कर्जतमधील नागापुरातही डेपो प्रस्तावित

नगर; पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील नागापूर येथे वाळू डेपो प्रस्तावित करण्यात आला असून, यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात नऊ वाळू डेपो निश्चित झाले आहेत. मात्र, अद्यापि वाळूविक्रीस कोठेच प्रारंभ झालेला नाही.
सर्वसामान्य जनतेला स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी तसेच अवैध वाळूउपसा आणि वाहतुकीला लगाम लावण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळूधोरण जाहीर केले. या धोरणानुसार शासन जनतेला 600 रुपये ब्रास या दराने वाळू विक्री करणार आहे. त्यासाठी वाळू डेपो तयार करण्यात येत आहेत. या वाळू डेपोत वाळू उपलब्ध करण्यासाठी वाळूगटांतून वाळूउपसा आणि वाहतूक तसेच वाळू डेपोचे व्यवस्थापन करण्यासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

जिल्हा प्रशासनाने पहिल्या प्रथम नायगाव, चापडगाव व चौंडी हे तीन वाळू डेपो निश्चित केले. त्यासाठी निविदा मागविल्या. मात्र, फक्त नायगाव डेपोला पसंती मिळाली. महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी उद्घाटन झाले. परंतु अद्यापि वाळूविक्रीस प्रारंभ झाला नाही. उर्वरित चौंडी व चापडगाव वाळू डेपोसाठी पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने त्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर, राहाता तालुक्यातील पुणतांबा, संगमनेर तालुक्यातील आश्वी बु., श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज, नेवासा तालुक्यातील निंभारी या सात ठिकाणी वाळू डेपो निश्चित केले आहेत. त्यासाठी निविदा देखील प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने कर्जत तालुक्यातील नागापूर येथे देखील वाळू डेपो सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निविदा देखील प्रसिद्ध केली असून 15 मे रोजी निविदा उघडली जाणार आहे. त्याकडे नागरिकांचे लक्ष असणार आहे.

दोन लाख ब्रास वाळू उपलब्ध होणार

या नऊ वाळू डेपोच्या माध्यमातून 1 लाख 94 हजार ब्रास वाळू विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव डेपोतील 67 हजार 539 ब्रास वाळूचा समावेश आहे. या डेपोसाठी ठेकेदार उपलब्ध झाला आहे. मात्र, उर्वरित आठ वाळू डेपोसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या डेपोसाठी ठेकेदारांची प्रतीक्षा आहेत.

Back to top button