नगर : गुरुजींच्या प्रमोशनला मुहूर्त सापडेना! | पुढारी

नगर : गुरुजींच्या प्रमोशनला मुहूर्त सापडेना!

नगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या वर्षभरापासून शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी या रिक्त पदावर पदोन्नतीची प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे प्रमोशनसाठी पात्र असलेले संबंधित 200 पेक्षा अधिक गुरुजींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दर वर्षी साधारणतः नवीन शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीलाच जुलै ते ऑगस्ट यादरम्यान शिक्षण विभागातील प्रमोशन प्रक्रिया राबविली जाते. गतवर्षीही जुलै-ऑगस्टमध्ये ही प्रक्रिया होऊन त्यात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची 200 पेक्षा अधिक रिक्त असलेल्या जागांवर पात्र गुरुजींचे प्रमोशन होईल, अशी अपेक्षा होती.

मात्र, शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेचे कारण देऊन ही पदोन्नती कागदावरच थांबवली गेल्याचे शिक्षकांमधून सांगितले जाते. परंतु, शिक्षक बदल्यानंतर जर हे प्रमोशन करायचे आहे, तर आता प्रमोशननंतर रिक्त होणार्‍या 200 जागांचे शिक्षण विभाग काय करणार? त्या रिक्त जागा तशाच ठेवणार का? असा सवाल उपस्थित करत बदल्यांच्या अगोदरच प्रमोशन प्रक्रिया पार पाडावी लागत होती, असेही धडे प्रशासनाला देण्यास शिक्षक मागे राहिलेले नाहीत. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी याप्रकरणी लक्ष घालून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया पारदर्शीपणे आणि तत्काळ पूर्ण करावी, असाही सूर शिक्षकांमधून आळवला जात आहे.

116 गुरुजींना मुख्याध्यापक पदाची लॉटरी!

पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक तसेच ज्येष्ठता व अन्य अटी व नियमांनुसार पात्र ठरणार्‍या शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. सध्या जिल्ह्यात 116 मुख्याध्यापकांची पदे ही पदोन्नतीने भरली जाणार आहेत.

विस्तार अधिकारीपदी 24 गुरुजींना पदोन्नती

जिल्ह्यात विस्तार अधिकारी ही 24 पदे रिक्त आहेत. या पदावर पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची ज्येष्ठता व अन्य अटी आणि नियमांनुसार पात्र शिक्षकांना पदोन्नती दिली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या पात्रता असलेल्या शिक्षकांना पदोन्नती दिली जाणार आहे.

केंद्रप्रमुख पदोन्नती लालफितीत!

एकीकडे मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी या पदाच्या रिक्त जागांवर पदोन्नती प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा परिषदेतून कासवगतीने का होईना पण हालचाली सुरू असल्या, तरी केंद्र प्रमुखांच्या रिक्त 63 जागांबाबत मात्र शासनाने कोणतेही मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे शासनाकडून सूचना आल्यानंतरच केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती होणार असल्याचे प्रशासन सांगत आहेत. त्यामुळे केंद्रप्रमुख पदोन्नतीदेखील प्रतीक्षेचा विषय बनली आहे.

शासनाचे दर वर्षी नियमित पदोन्नती करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही ही प्रक्रिया राबविली जात नाही. अशा चुकीच्या धोरणांमुळे कर्मचारी सेवानिवृत्त होतो, तरीही त्याला पदोन्नती मिळत नाही. कालबाह्य संचमान्यतेवर पदोन्नती प्रक्रिया न करता शिक्षकांचे समायोजन करणे हे शासन आदेशाविरुद्ध आणि अन्यायकारक आहे.

                                           -प्रवीण ठुबे, शिक्षक नेते

आपल्या सेवेत प्रमोशन हा शिक्षकांना एकमेव फायदा आहे. त्यामुळे पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचे प्रमोशन नियमितपणे व्हायला हवे. त्याचा फायदा शिक्षकांबरोबरच प्रशासनालाही होईल. रिक्त जागांवर इतर शिक्षकांची सोय होईल.

                                    – डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते

शिक्षण विभागात नवीन पदभरती नसली तरी किमान रिक्त असलेल्या पदोन्नतीच्या जागा तरी वेळेत भरणे अपेक्षित आहेत. बदल्यांच्या प्रक्रियेपूर्वीच पदोन्नती व्हावी, जेणेकरून पदोन्नतीनंतर रिक्त होणार्‍या जागांचा तिढा निर्माण होणार नाही आणि त्याचा मुलांच्या शिकवणीवर परिणाम होणार नाही.

                                                 – एकनाथ व्यवहारे, इब्टा

Back to top button