नगर : कोतवाली पोलिसांचे बुलेट चोरट्यांना ‘फटाके’ ; चौघांना अटक | पुढारी

नगर : कोतवाली पोलिसांचे बुलेट चोरट्यांना ‘फटाके’ ; चौघांना अटक

नगर; पुढारी वृत्तसेवा : बुलेट दुचाकीची चोरी करून भंगार बाजारात विक्री करणार्‍या दोन चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यासोबतच भंगारात बुलेटचे सुटे भाग खरेदी करणार्‍या दोन दुकानदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मनीष फुलढाले (वय 52, रा.खिस्तगल्ली,अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बुलेटची चोरी करणार्‍या अहमद मुन्ना शेख (रा.मुकुंदनगर, अहमदनगर), शाहरुख आलम शेख (रा.नागरदेवळे, ता.अहमदनगर) या दोघांसह बुलेटचे स्पेअर पार्ट भंगारात खरेदी करणार्‍या जावेद ऊर्फ रऊफ शेख (रा. सादीक मळा, भिंगार), राम विलास ससाणे (रा.गजराजनगर, अहमदनगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बुलेटची चोरी अहमद मुन्ना शेख याने केली असून, शाहरुख आलम शेख याच्या मदतीने बुलेट घरात लपवून ठेवल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली.

तसेच, आरोपींनी बुलेटचे स्पेअर पार्ट भंगारात विकल्याची माहिती यादव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुलेट चोरणार्‍या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी बुलेटचे स्पेअर पार्ट भंगारात विकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी स्पेअर पार्ट खरेदी करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले. चोरीतील बुलेटचे स्पेअर पार्ट पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

पुढील तपास पोलिस नाईक बाळासाहेब मासाळकर करीत आहेत. कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे, तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, बिल्ला इनामदार, योगेश खामकर, बाळासाहेब मासळकर, संदीप थोरात,अमोल गाढे, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ यांनी ही कारवाई केली.

चार आरोपींना पोलिस कोठडी

बुलेटची चोरी करणार्‍या अहमद मुन्ना शेख, शाहरुख आलम शेख या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच, बुलेटचे स्पेअर पार्ट भंगारात खरेदी करणार्‍या जावेद ऊर्फ रऊफ शेख, राम विलास ससाणे या दोघांना न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Back to top button