धक्कादायक ! 15 दिवसांमध्ये 6 जण अपघातात ठार | पुढारी

धक्कादायक ! 15 दिवसांमध्ये 6 जण अपघातात ठार

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वडाळा महादेव परिसरासह श्रीरामपूर नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रीज ते वडाळा महादेव- खोकर फाटा या परिसरामध्ये वारंवार अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून वडाळा महादेव बस स्टण्ड परिसर ते धार्मिक आश्रमांपर्यंत वेगवेगळे मोठे अपघात होऊन यामध्ये तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, नेहमीच होणार्‍या अपघातानंतर या परिसरातील स्थानिक नागरिकांचे मोठे सहकार्य लाभते, परंतु नेमकं याच परिसरामध्ये वारंवार का अपघात होतात, असे प्रश्नचिन्ह नागरिकांसमोर उभे ठाकले आहे. यापूर्वी या परिसरातील वटवृक्षांच्या झाडांवर आदळून अनेक अपघातांच्या मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. स्थानिक जुन्या पिढीतील काही नागरिकांच्या मते दाट झाडे आडवी येत असल्याने वाहन चालकांना समोरचे स्पष्ट दिसत नाही.

काही जाणकार सुज्ञ नागरिकांच्या मते या वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे वारंवार अपघात होतात. प्रशासनाकडून रस्ता दुरुस्तीचे काम होऊन खड्डेविरहित रस्ता निर्माण झाल्याने सध्या वाहनचालक भरधाव वेगाने दुचाकी व चार चाकी वाहने चालवितात. काहींच्या मते मद्य प्राशन करून काही चालक वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा काही बेदरकार वाहन चालकांमुळे अपघात होऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्‍यांनाही धोका पोहोचविण्याचे दुष्कर्म काही वाहन चालक करतात. प्रशासनाकडून नेवासा रोड-रेल्वे ओव्हर ब्रीज- हरेगाव फाटा- अशोकनगर फाटा व धार्मिक आश्रमांजवळ वडाळा महादेव बस स्टॅण्ड कॉलेज परिसर आदी ठिकाणी गतीरोधक बसविणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे अपघातास आळा बसण्यास मदत होईल, असे येथील काही स्थानिक जागरुक नागरिक म्हणतात.

Back to top button