खरीप हंगामासाठी साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र | पुढारी

खरीप हंगामासाठी साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र

नगर : पुढारी वृत्तसेवा :  यंदाच्या खरीप हंगामासाठी 6 लाख 49 हजार 730 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यामध्ये कापसासाठी 1 लाख 32 हजार हेक्टर, बाजरीसाठी 91 हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगापासाठी 10 हजार हेक्टर क्षेत्र अधिक प्रस्तावित केले आहे. खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपला आहे. खरीप हंगामासाठी कृषी विभागाने हेक्टरी क्षेत्र निश्चिचत केले आहे. गेल्या वर्षी 6 लाख 40 हजार 583 हेक्टर क्षेत्र निश्चित केले होते. यंदा मात्र, यामध्ये 10 हजार हेक्टर क्षेत्राची वाढ करुन ते 6 लाख 49 हजार 730 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.

यामध्ये 1 लाख 78 हजार 300 हेक्टर क्षेत्र तृणधान्यासाठी असणार आहे. यामध्ये बाजरी पिकासाठी 91 हजार हेक्टर, 71 हजार हेक्टर क्षेत्रावर मका, 16 हजार हेक्टरवर क्षेत्रावर खरीप भाताच्या पेरणीचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षी 89 हजार 383 हेक्टर क्षेत्र बाजरीसाठी तर 69 हजार 392 हेक्टर क्षेत्र मकासाठी प्रस्तावित केले होते. यंदा 1 लाख 81 हजार हेक्टर क्षेत्र खरीप कडधान्यासाठी प्रस्तावित आहे. यामध्ये 56 हजार हेक्टर तूर, 48 हजार हेक्टर मूग तर 68 हजार हेक्टर क्षेत्रावरील उडदाचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तूर, मूग व उडदाचे क्षेत्र वाढविण्यात आले आहे. गेल्या वर्षी 1 लाख 31 हजार 962 हेक्टर क्षेत्र कापसासाठी निश्चित केले होते. यंदा मात्र, 1 लाख 32 हजार हेक्टर क्षेत्र कापसासाठी निश्चित केले आहे.

खताचा मागणीइतका पुरवठा होणार
यंदा वर्षभरासाठी 3 लाख 7 हजार 382 मे. टन रासायनिक खताची मागणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी 2 लाख 16 हजार 508 मे.टन आवंटन मंजूर आहे. मार्च 2023 पर्यंत 81 हजार 617 मे.टन खाताचा साठा शिल्लक आहे. खरीप हंगामासाठी सध्या 23 हजार 151 टन साठा प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 1 लाख 4 हजार 768 मे.टन खताचा साठा उपलब्ध आहे. त्यापैकी 6 हजार 48 मे.टन खताची विक्री झाली. रासायनिक खतांचा मागणी इतका पुरवठा होणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी सांगितले.

सोयाबीनसाठी सर्वाधिक 1.52 लाख हेक्टर
गळीत धान्यासाठी यंदा 1 लाख 57 हजार 630 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यामध्ये सर्वाधिक 1 लाख 52 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनसाठी असणार आहे. भुईमूगसाठी 5 हजार,सूर्यफूलसाठी 200, तीळासाठी 130 व कारळ्यासाठी 300 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे.

Back to top button