नगर : चोरी करणार्या पाच संशयितांना पकडले

पाथर्डी तालुका (नगर ): पुढारी वृत्तसेवा : चोरी करणार्या पाच संशयित आरोपींना पाथर्डी पोलिसांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान पकडले. पाच पैकी तीन आरोपी हे अल्पवयीन असून त्यांना कायदेशीर कारवाई करून सोडून देण्यात आले. आकाश सोमनाथ पवार (वय 19), विकास सोमनाथ पवार (वय 20) व अन्य 16 ते 17 वयोगटातील तीन अल्पवयीन (सर्व रा भोसे, ता.पाथर्डी) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिस कॉन्स्टेबल संदीप बडे, लतिफ सय्यद हे शुक्रवारी (दि.5) रात्री पेट्रोलिंग करत होते.
निवडुंगे शिवारात त्यांना दोन दुचाकींवर पाच इसम संशयितरित्या जाताना दिसले. त्यातील एका स्कूटीवर दोन इसमांच्या मध्ये एक पाण्याचे इंजिन होते. पोलिसांना पाहून हे इसम पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली त्यांना इंजिनबाबत माहिती देता आली नाही. कागदपत्रांबाबत विचारले असता नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हे इंजिन चोरीचे असल्याचा पोलिसांचा संशय निर्माण झाला. त्यामुळे आरोपींसह इंजिन, दोन दुचाकी ताब्यात घेतल्या.