

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी आगारातील एसटी बसची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, एकही बस रस्त्यावर सुस्थितीत धावत नाहीत. पाथर्डीचा आगार भंगारात काढण्याची वेळ आली आहे. तर, जिल्ह्याला आलेल्या नवीन 40पैकी 30 बस उत्तरेकडेच दिल्याची माहिती आहे. म्हणजेच निधी तर पळीविला जातच आहे, आता बसचीही पळवापळी होताना दिसून येत आहे.
पाथर्डी तालुक्यातून एसटी महामंडळाची प्रवाशांसाठी सेवा अनेक जिल्ह्यांसाठी देण्यात येते; मात्र हीच प्रवाशांची सेवा आता असून अडचण नसून खोळंबा अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे.
यामुळे पाथर्डी आगारातील चालक, वाहक, प्रवासी व नागरिक हातबल झाले आहेत. सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. या काळात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक एसटीतून प्रवास करतात. हाच प्रवास आता बिन भरोसाचा झाला आहे. तर, दुसरीकडे लग्नसराई व उन्हाळ्याची सुटीचा काळ पाहता राज्य परिवहन मंडळाने 25 टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ जर अशा बसने प्रवास करावा लागत असेल, तर प्रवाशांना काहीच कामाची नाही. किमान चांगली सुुविधातरी द्यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
पाथर्डी आगारातील एकही गाडी म्हणावं अशा चांगल्या अवस्थेत नाही.
पाथर्डी आगारातील एसटी बस दररोज कुठल्या ना कुठल्या रस्त्यावर नादुरुस्त झाल्याचे पहावयास मिळते. यामुळे प्रवाशांना जाण्याच्या ठिकाणी अडचण निर्माण होऊन मध्येच अडकावे लागते. राज्य सरकारने महिलांसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात एसटीचा प्रवास ही योजना अंमलात आणली. तेव्हापासून एसटीवरचा प्रवाशांचा अधिकचा भार वाढलेला आहे. त्यात एसटी बसच्या गाड्या वेळेवर त्याची देखभाल दुरुस्ती होत नाही. फक्त नावापुरत्या बसेस उरल्या आहेत, शिल्लक आहे. परिवहन विभागाचे नियम डावलून पाथर्डी आगारातील अनेक बसेस ज्यांच्या कालमर्यादा आणि किलोमीटरची मर्यादा संपूर्ण संपुष्टात आली आहे.
अशा गाड्या प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत. एसटी बसचे चालक वारंवार गाड्यांच्या तांत्रिक खराबी बाबत लेखी पाठपुरावा अथवा तोंडी एसटीच्या कार्यशाळेत करतात; परंतु त्या गाड्या दुरुस्त होत नाही. गाड्यांचे सुट्टे भाग वेळेवर उपलब्ध होत नाही. दैनंदिन कामासाठी लागणारे साहित्य कार्यशाळेत नसल्याने गाड्यांची थातूरमातूर मलमपट्टी करून बस जीवघेणा प्रवास करण्यास रस्त्यावर पाठवल्या जातात. त्याला एसटी आगारच जबाबदार आहे.
अन् चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
प्रवासास योग्य नसलेल्या पाथर्डी आगाराची पाथर्डी ते तुळजापूर एसटी बस स्टेरिंग लॉक झाल्याने रविवारी शेकटा फाट्याजवळ बंद पडली. चालक व वाहकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. वारंवार होणार्या अशा घटनांमुळे ज्येष्ठ नागरिक, भगिनी, छोटी मुलं, विद्यार्थी व अन्य प्रवासी आदींचे अतोनात हाल होताना नेहमी पहावयास मिळते.
गिअर पडत नसल्याने बस परत
आज सकाळी नऊ वाजता सुटणारी पाथर्डी-नाशिक बस अमरापूर इथून गिअर पडत नसल्याकारणाने परत आली. चालक डेपोमध्ये गिअर पडत नसल्याची कल्पना देऊनही बळजबरीने नाशिकसाठी जावं लागेल असे सांगितल्याची अशी माहिती आहे.
जिल्ह्यासाठी नवीन 40 बस
नगर जिल्ह्यासाठी नव्याने 40 बस शासनाकडून देण्यात आल्या आहेत. नगर येथील तालुका डेपोसाठी दहा बस, तर उत्तरेतील संगमनेर, श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यांसाठी 30 बस देण्यात आल्या. या गोष्टी पाहिल्या तर दक्षिणेतील एकही आगाराला नवीन बस देण्यात आल्या नाहीत. सर्व बस उत्तरेसाठी देण्यात आल्याने दक्षिण, उत्तर असा दुजाभाव एसटी महामंडळाने केला.
पाथर्डी आगारामध्ये एकही बस प्रवासा योग्य नाही. सर्व बस 10 ते 15 लाख किलोमीटर धावलेल्या आहेत. तेथील कर्मचारी विश्वासाने सांगत आहेत. तरीही पाथर्डी आगाराला एकही नवीन बस का मिळत नाही असा मोठा प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांसाठी आम्ही सोमवारी पाथर्डी आगार बंद आंदोलन करणार आहोत.
– मुकुंद गर्जे, सामाजिक कार्यकर्ते