नगरमध्ये पाण्यासाठी शेतकर्‍यांची वज्रमूठ | पुढारी

नगरमध्ये पाण्यासाठी शेतकर्‍यांची वज्रमूठ

कान्हूरपठार (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी पारनेरच्या पठार भागाला आपल्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी सर्वसामान्य भूमिपुत्रांनी आता वज्रमूठ बांधली आहे. पाण्याच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी कान्हूरपठार (ता.पारनेर) येथे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची कष्टकर्‍यांची बैठक झाली. यामध्ये परिसरातील सामाजिक कामांमध्ये आवड असलेल्या युवकांनी सहभागी नोंदविला. बैठकीत पाण्यासाठी एकसंघपणे लढा उभारण्याचे निश्चित करण्यात आले.

पारनेरच्या 1 टीएमसी पाण्यासंदर्भातील ज्वलंत प्रश्न अनेक दिवसांपासून भिजत पडला आहे. त्यामुळे पठार भाग व उत्तर भाग हा पाण्यावाचून आजही कोरडा आहे. हा पाण्याचा 1 टीएमसीचा प्रश्न मार्गी लागल्यास पारनेरच्या पठार भागातील व उत्तर भागातील 50 ते 60 गावांना याचा लाभ होणार आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाला भाग पाडण्यासाठी मोठा जनसंघर्ष उभा करणे गरजेचे असून, या संदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बैठकीमध्ये पाण्याच्या प्रश्नावर 30 वर्षांपासून काम, अभ्यास करणारे, लाभ क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पठार भागाच्या पाणी प्रश्नावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. पाणी मिळविण्यासाठी कशा पद्धतीने शासनस्तरावर आपल्याला पाठपुरावा करावा लागेल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. हक्काच्या 1 टीएमसी पाण्यासाठी आता आपल्याला कशा पद्धतीने लढा उभारावा लागेल, यासाठी लोक जागृती कशा पद्धतीने करावी लागेल, लोकांना या लढाईमध्ये कशा पद्धतीने सहभागी करून घेता येईल, अशा अनेक प्राथमिक विषयांवर चर्चा करण्यात आली. या लढाईला गती देण्यासाठी काय केले पाहिजे यावरही साधक बाधक चर्चा करण्यात आली. समन्वय समिती तयार करून त्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात यावा, असे सुचविण्यात आलेे. यावेळी पाणी प्रश्ना संदर्भात प्राथमिक स्वरूपाची समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.

शासनस्तरावर या संदर्भात पाठपुरावा करून ही जलसिंचन योजना मार्गी लागणे गरजेचे आहे. ही जलसिंचन योजना पूर्ण करून घेण्यासाठी आता आपण शासनस्तरावर पाठपुरावा तीव्र गतीने करून प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.

शेतीला पूरक पाणी उपलब्ध होईल
बैठकीला उपस्थित लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी आपले मत व्यक्त केले. शेतकरी म्हटले की, पारनेरच्या पठार भागावरील पाणीप्रश्न सोडविणे अतिशय गरजेचे आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास शेतीला पूरक पाणी उपलब्ध होईल. गेल्या 50 वर्षांपासूनची आपल्या सर्वांची ही मागणी आहे.

Back to top button