नगर : उस्थळ दुमाला हद्दीत ‘छमछम’ला विरोध | पुढारी

नगर : उस्थळ दुमाला हद्दीत ‘छमछम’ला विरोध

नेवासा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला ग्रामपंचायत हद्दीत बाभूळवेढा शिवारात होत असलेल्या कलाकेंद्राला ग्रामस्थांनी विरोध व्यक्त केला आहे. ग्रामसभेतही विरोध करत कला केंद्राच्या आडून गावाची बदनामी व लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त होण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या विरोधामुळे ‘छमछम’ शौकिनांची धडधड निश्चित वाढणार आहे. उस्थळ दुमाला येथे महाराष्ट्र दिनानिमित्त रोजी ग्रामसभा पार पडली. यात गावातील विविध विषयांवर चर्चा झाली. काही व्यक्तींनी नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत उस्थळ दुमाला ग्रामपंचायत हद्दीतील बाभूळवेढा येथे कलाकेंद्रासाठी परवानगी ग्रामपंचायतीकडे मागण्यात आली; परंतु या परिसरात शनिदेव चौथरा व कानिफनाथ मंदिर, अशी धार्मिक स्थळे आहेत.

कलाकेंद्राच्या आडून वेगळेच उद्योग सुरू होण्याच्या भीतीने त्यावर ठाम निर्णय झाला नसला तरी, या कलाकेंद्रास ग्रामस्थांचा कडाडून विरोध आहे. सरपंच किशोर सुकाळकर, उपसरपंच राजेंद्र भदगले, ग्रामसेवक दळवी भाऊसाहेब, कैलास पिटेकर, प्रशांत सुकाळकर, बाबा कोतकर, सचिन कराड, जयसिंग गायकवाड, भाऊसाहेब वाघ, राधाकिसन वाघ, भारत पिटेकर, गणेश गायकवाड, गणेश सुकाळकर, दत्तू गरड, निखिल वाघ, संदीप काळे, पोलिस नाईक जयंत तोडमल, गुंजाळ आदी उपस्थित होते.

उस्थळ दुमाला ग्रामपंचायत हद्दीत कलाकेंद्रास आमचा विरोध आहे. नियोजित कलाकेंद्राच्या परिसरात धार्मिक स्थळ आहे. प्रसंगी कलाकेंद्राच्या विरोधात ग्रामसभा घेऊन विरोधाचा ठराव घेऊ; वेळ पडल्यास विरोधात जनआंदोलनही करू.
                               -सोनाली पिटेकर, ग्रामपंचायत सदस्य, उस्थळ दुमाला.

Back to top button