निवडणुका ऐन दिवाळीत? बाजार समिती निवडणुकीने बदलली जिल्हा परिषद, पंचायत समितीची गणिते | पुढारी

निवडणुका ऐन दिवाळीत? बाजार समिती निवडणुकीने बदलली जिल्हा परिषद, पंचायत समितीची गणिते

जवळा (नगर) : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यात नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत संपूर्ण तालुक्यात एकट्या जवळा परिसरातून पाच उमेदवारांना संधी मिळाल्याने पुढील येणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची गणिते बदलली आहेत. तालुक्याचा राजकीय इतिहास सतत बदलणारे जवळा गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून, या गावावर सर्वांची सतत नजर असते. त्यामुळे आजी-माजी आमदारांनी मुत्सद्देगिरी दाखवून बर्‍याच भावी मतब्बरांची बाजार समितीत गुंतविल्याने नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऐन दिवाळीच्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा असून, बाजार समिती निवडणुकीवरून पारनेरलाही आता ‘लक्ष्मीदर्शन’ पॅटर्नची सवय लागल्याने मजबूत भांडवल ही पुढील निवडणुकीत उमेदवारांना लागणार आहे. जवळ्यातून महविकास आघाडीचा उमेदवार नसणार हे जवळपास निश्चित असल्याने महाविकास आघाडीकडून माजी सभापती सुदाम पवार यांचा जिल्हा परिषदेचा मार्ग एकतर्फी झाला आहे. तर, आमदार नीलेश लंके यांचे निकटवर्तीय सांगवी सूर्याचे उद्योजक सुरेश म्हस्के यांचाही मार्ग सुकर झाला आहे.

भाजपकडून पंचायत समितीसाठी जवळा सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष शिवाजी सालके, वडुलेचे सोन्याबापू भापकर, किंवा सोनाली सालके यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे. तर, जिल्हा परिषदेसाठी गेल्या बाजार समिती निवडणुकीत राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले यांनी महाविकास आघाडीच्या बलाढ्य यंत्रणेपुढे दिलेली कडवी एकतर्फी लढत हा तालुक्यात नव्हे जिल्ह्यात विलक्षण चर्चेचा विषय ठरला. ते खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे ते भाजपचे जिल्हा परिषदेचे प्रबळ दावेदार ठरू शकतात.

नवीन चेहर्‍यांचा दुसरा मार्गही मोकळा
आघाडी नव्हती तेव्हा दोन आजी-माजी आमदारांचे बहुसंख्य कार्यकर्ते विभागले होते. त्यांनी त्यावेळी त्या दृष्टीने उमेदवार्‍या देऊन तयारीला लावले होते; परंतु महाविकास आघाडी झाल्याने वरिष्ठांनीही इस्टापत्ती समजून जवळ्यातून बरेच दिग्गज उमेदवार बाजार समितीत देऊन भविंचा निकाल लावला. त्यामुळे काही अंशी आता नवीन चेहर्‍यांना संधी मिळण्याचा दुसरा मार्गही मोकळा झाला आहे.

 

Back to top button