छापा टाकून 13 महिलांची हॉटेलमधून सुटका

शिर्डी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने शिर्डीतील हॉटेल्सची झाडाझडती केली असता 6 हॉटेलमध्ये 13 महिला आढळल्या. त्यांच्याकडून देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडणार्या 8 जणांना पथकाने ताब्यात घेतले. दोन अज्ञात आरोपी पसार झाले. त्यांच्याविरुद्ध पिटा अंतर्गत शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शिर्डीमध्ये महिलांना देहविक्री करण्यास भाग पाडले जात असल्याची कुण कुण पोलिसांना गुप्त खबर्यामार्फत लागली होती. त्यानुसार शुक्रवारी सायं. 7 ते रात्री 9. 30 वाजेपर्यंत पोलिसांनी शिर्डीत वेगवेगळ्या 6 हॉटेलवर पंटर पाठवून महिलांकडून देहविक्री केली जात असल्याची खातरजमा केली. यावेळी महिलांसह आंबट शौकिनांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हॉटेल महाराजा येथे दौलत किसन लटके (रा. अंबिकानगर, कोपरगाव) याला ताब्यात घेतले. एस. पी. लॉजिंगमधून सचिन दौलत आहेर (रा. बिरोबानगर, शिर्डी) व सूरज दौलत लटके (रा. अंबिकानगर) तर हॉटेल साई कीर्ती येथून आदित्य नितीन शेजवळ (रा. भीमनगर, शिर्डी) व राहुल राजेश जाधव (रा. निमगाव कोर्हाळे), हॉटेल साई गणेश लॉजिंग येथून गणेश सुखदेव गायकवाड (रा. बाजारतळ, शिर्डी) व सिद्धार्थ राजेंद्र पाळंदे (शिपलापूर), तर हॉटेल एक्झिक्युटिव्ह व हॉटेल साई शीतल येथून दोघे अज्ञात पसार झाले.
7 जणांना राहाता न्यायालयात हजर केले. ही कारवाई पो. अधीक्षक राकेश ओला, अ. पो. अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपअधीक्षक संदीप मिटके, पो. नि. नंदकुमार दुधाळ व पोलिसांनी केली.