नगर : लग्नात घालण्यास आणलेले सोन्याचे दागिने लांबविले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : लग्नात घालण्यासाठी आणलेले पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी बॅगमधून लांबविल्याची घटना तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी वैशाली गणेश जावळे (वय 32, रा.कोल्हार कोल्हुबाई, ता. पाथर्डी. हल्ली रा. मुंबई) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावळे यांनी भाचीच्या लग्नासाठी 3 मे रोजी मुंबई येथून आल्या होत्या. हळदीच्या कार्यक्रमासाठी कासार पिंपळगाव येथील मंगल कार्यालयात त्या सायंकाळी 6 वाजता आल्या.
त्यानंतर त्यांनी बॅग तपासली असता त्यातील पैसे व सोन्याचे दागिने होते. हळदीचा कार्यक्रम सुरु असताना बॅग वधू कक्षामध्ये ठेवून त्या बाहेर नवरदेव नवरीला हळद लावण्यासाठी आल्या. रात्री 8 च्या सुमारास त्या वधू कक्षात गेल्यावर बॅगची कोणीतरी उचकापाचक केलेली दिसली. त्यांनी बॅग तपासली असता त्यात ठेवलेले तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, दीड तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, अर्धा तोळ्याचे सोन्याचे कानातील झुंबर व चांदीचे जोडवे चोरी गेल्याचे आढळले.