नगर जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत 10 हजार मुली कमी ! जन्मदर चिंताजनक; गत तीन वर्षांतही विषमताच | पुढारी

नगर जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत 10 हजार मुली कमी ! जन्मदर चिंताजनक; गत तीन वर्षांतही विषमताच

नगर : स्त्री-भ्रूणहत्या, बेटी बचाव, माझी कन्या सुकन्या, स्त्रीजन्माचे स्वागत, अशा विविध योजनांमधून मुलींच्या जन्मदरवाढीसाठी शासन जनजागृती करत आहे. असे असताना अजुनही मुलींचा जन्मदर हा मुलांच्या तुलनेत कमीच असल्याचे निदर्शनास येत आहे. गत तीन वर्षांत मुलांपेक्षा मुलींचा जन्म हा 10 हजाराने कमी असल्याचे आकडेवारी सांगत आहे. त्यामुळे हे जन्मदराचे गुणोत्तर चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलींच्या जन्मदराचा प्रश्न चिंताजनक आहे. स्त्री-पुरुष समानतेबाबत शासनाकडून तसेच सामाजिक, शैक्षणिक संस्थांकडूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. जन्मापूर्वीच लिंगनिदान करून मुलींच्या गर्भाची हत्या केली जात होती. त्यामुळे शासनानेही गर्भलिंगनिदान चाचणीवर बंधने घातलेली आहेत. कठोर कायदाही केलेला आहे. असे असताना अजुनही बाललिंग गुणोत्तराचे प्रमाण चिंताजनक आहे. नगर जिल्ह्यात मुलांमागे मुलींचे प्रमाण हे सरासरी 913-914 इतके असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या एका अहवालातून समोर आले आहे.

गतवर्षात हजार मुलांमागे

914 मुली
एप्रिल 2022 ते मार्च 2023 या वर्षभरात 39 हजार 572 मुलांनी जन्म घेतला, तर 36 हजार 162 मुलींचा जन्म झालेला आहे. त्यामुळे मुलांच्या तुलनेत 3410 मुलींचा जन्म कमी आहे. तर जन्मदराचा विचार करता एक हजार मुलांमागे 914 मुली इतका असल्याचे दिसले आहे.

तीन वर्षांत एक लाख कन्यारत्न !
सन 2020,2021, आणि 2022 या तीन वर्षांचा आढावा घेतला तर त्यात 1,15,596 मुलांचा जन्म झालेला आहे. तर याच तीन वर्षांत 1,05,592 मुलींचा जन्म झालेला आहे. मुलांच्या तुलनेत या तीन वर्षांत 10 हजार मुलींचा जन्म कमी असल्याने ही विषमता चिंताजनक आहे.

गर्भलिंगनिदान तपासणी कागदावरच?
शासनाने गर्भलिंगनिदानावर बंधने घातली असली, तरी जिल्ह्याच्या उत्तरेतील काही तालुक्यांत असे प्रकार सुरूच असल्याची चर्चा आहे. शिवाय आरोग्य विभागाने वर्षभरात किती ठिकाणी कारवाई केली, किंवा सोनोग्राफी मशिन सील केले, याबाबतही आकडेवारी मिळू शकलेली नाही.

Back to top button