‘रत्नदीप’चे डॉ. मोरेंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा ; गुन्हा दाखल होताच मोरे पसार | पुढारी

‘रत्नदीप’चे डॉ. मोरेंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा ; गुन्हा दाखल होताच मोरे पसार

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर कॉलेजचे प्रमुख डॉ. भास्करराव मोरे यांच्याविरुद्ध विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच मोरे हे पसार झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील 19 वर्षीय विद्यार्थिनी रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे बी. फार्मसीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तिनेच याबाबत फिर्याद दिली आहे. 21 फेब्रुवारी 2023 ते एप्रिल 2023 या काळात मोरे यांनी ‘सुंदर दिसतेस,’ ‘माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहा’ असे वारंवार म्हणत वेळोवेळी अँटिचेंबरमध्ये नेण्याचा प्रयत्न केला.

त्यास विरोध केल्याने डॉ. मोरे यांनी तिचा हात पकडत लज्जास्पद वर्तन करत विनयभंग केला, असा फिर्यादीचा आशय आहे. त्यावरून डॉ. मोरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि कलम 354, 354 (अ), 509 प्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेडचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल भारती तपास करत आहेत. मोरे यांच्याविरोधात विद्यार्थीनीनेच गुन्हा दाखल केल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पसार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Back to top button