धक्कादायक ! अल्पवयीन मुलीची झाली प्रसुती ; पोक्सोसह विविध कलमान्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा | पुढारी

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीची झाली प्रसुती ; पोक्सोसह विविध कलमान्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्यावर्षी बालविवाह झाल्यानंतर अवघ्या 17 व्या वर्षी ती प्रसुत झाली. प्रसुतीनंतर तिचे पुन्हा पोट दुखू लागले. ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांना संशय आल्यामुळे त्यांनी तिच्या विवाहाबाबत विचारणा केली असता हा बाल विवाहाचा प्रकार असल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांनी तिच्या नवर्‍यासह आई-वडील व सासू-सासर्‍याविरुद्ध अत्याचार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पोक्सो) बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुक्यातील मुळचे जोर्वे येथील एका अल्पवयीन मुलीचा गेल्यावर्षी 22 वर्षीय तरुणाशी विवाह लावून देण्यात आला होता. लग्नाच्यावेळी ती अवघी 16 वर्षांची होती. लग्नानंतर तिला दिवस गेले. गेल्या आठवड्यात तिची प्रसुती झाली, मात्र त्यानंतरही तिच्या पोटात दुखत असल्याची ती वारंवार नवर्‍याकडे तक्रार करू लागली. यानंतर नवर्‍याने तिला घुलेवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांना तिची शरीरयष्टी पाहून संशय आला. त्यांनी तिच्या नवर्‍याकडून तिच्या आधारकार्डची मागणी केली. ते पाहिले असता मुलीचे वय अवघे 17 वर्षे असल्याचे आधारकार्डवरून उघड झाले.

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी याबाबत संगमनेर तालुका पोलिसांना लेखी माहिती दिली.
विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे, पो. उ. नि. विजय खंडीझोड यांच्यासह महिला पोलिस घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आले. यावेळी मुलीवर उपचार सुरू होते. महिला पोलिस कर्मचार्‍यांनी तिच्याशी संवाद साधत तिला विश्वासात घेत तिच्याकडून आवश्यक माहिती मिळविली. मुलीने दिलेल्या जबाबावरून तिचे लग्न अवघ्या 16 व्या वर्षी झाले तर प्रसुती 17 व्या वर्षी झाल्याचे वास्तव समोर आले.

पोलिसांनी तिचे आधार कार्ड व जन्म दाखला मागावून घेत त्याची पडताळणी केली असता ती 17 वर्षांची झाली असल्याचे तपासात उघड झाले. मुलीच्या लग्नाचे वय 18 असल्याचे माहिती असूनसुद्धा तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न लावून दिले. यामुळे पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरून तिचे आई-वडिलांसह सासू-सासरा, त्याच्याशी संबंध प्रस्थापित करणारा तिचा 23 वर्षीय पती अशा पाच जणांविरोधात संगमनेर तालुका पोलिसांनी बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कलम 6 (1), 4 व बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय खंडीझोड आदी पोलिस अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

श्रीरामपूरनंतर संगमनेर तालुक्यात दुसरी घटना..!
श्रीरामपूर तालुक्यातील एका अल्पवयीन (17 वर्षीय) मुलीचा संगमनेर तालुक्यातील कनोली येथील 29 वर्षीय तरुणाशी बाल विवाह झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या तपासणीतून 16 वर्षांच्या दुसर्‍या मुलीचा बाल विवाह करून अवघ्या 17 व्या वर्षी ती प्रसूत झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Back to top button