शाळा विकासाचा ‘बीओटी’ पॅटर्न राज्यात राबविणार : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर | पुढारी

शाळा विकासाचा ‘बीओटी’ पॅटर्न राज्यात राबविणार : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  लोणी येथील जिल्हा परिषद शाळेचा बीओटी तत्त्वावर विकास करण्याचा पॅटर्न राज्यातही राबविणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी (दि. 5) केली. येत्या शैक्षणिक वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही नर्सरी व केजीच्या शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोणी खुर्द येथे ‘बांधा, वापरा, हस्तांतरीत करा’ (बीओटी) तत्त्वावर बांधलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा इमारतीचा लोकार्पण सोहळा व लोणी बुद्रुक येथील व्यापारी संकुलाचे उद्घाटन मंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा स्मृतिदिन व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि लोणी बुद्रुक येथील अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळा केसरकर यांच्या उपस्थितीत झाला.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील अध्यक्षस्थानी होते. उद्धव महाराज मंडलिक, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती राजेंद्र विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम व बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा बँकेचे संचालक आंबादास पिसाळ, भाऊसाहेब विखे आदी उपस्थित होते. या वेळी मोफत अपघात विमा योजनेतील धनादेश सात कुटुंबांना केसरकर यांच्या हस्ते देण्यात आले.

राज्यात जिल्हा परिषदांच्या 75 हजार शाळा आहेत. त्यांच्या इमारतींचा विकास करताना शालेय शिक्षणाचा पायासुद्धा भक्कम करण्याची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याने बीओटी तत्त्वावर जिल्हा परिषद शाळांचा विकास करण्यासाठी जो पॅटर्न राज्याला दिला, त्याचे कौतुक करावे लागेल, असे गौरवोद्गार काढून मंत्री केसरकर म्हणाले, “या परिसराने नेहमीच काहीतरी शिकण्याची संधी दिली. तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व पद्मभूषण डॉ. विखे पाटील यांनी खूप वर्षांपूर्वी ओळखले होते. त्याचा अंतर्भाव आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या शिक्षण धोरणात केला आहे. त्यामुळेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणार्‍या सर्व सुविधा येत्या शैक्षणिक वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामध्ये नर्सरी व केजीचा समावेश राहील.”

जगाचे नेतृत्व करण्याची संधी
भारत वेगवेगळ्या क्षेत्रांत आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करीत आहे. हे बळ जगाला पुरविण्याची क्षमता आता देशामध्ये आहे. कारण बर्‍याच कालखंडानंतर जगाचे नेतृत्व करण्याची संधी भारताला आली आहे. त्यामुळेच शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन भारतीय संस्कृती व इतिहासाचे स्मरण भविष्यातील पिढीला करून देण्यासाठी, शिक्षण क्षेत्रात याचे मोठेपण टिकविण्याची जबाबदारी आम्हाला घ्यावी लागेल, असे केसरकर म्हणाले.

आमच्या समाजव्यवस्थेचा पाया अध्यात्मावर आधारित आहे. राजकारणात काम करताना विखे पाटील कुटुंबीयांनी आध्यात्मिक वारसा सप्ताहांच्या माध्यमातून जपला. दैवतांची आठवण दिल्लीमध्येसुद्धा ठेवणारे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील हे एकमेव होते. त्यामुळेच संत तुकारामांचे नाणे प्रकाशित होऊ शकले. कोकणात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासाठी डॉ. विखे यांनी प्रयत्न केले. त्यास आता पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून मूर्त स्वरूप येत आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.
महसूलमंत्री विखे पाटील यांनी सांगितले, की लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी या सप्ताहाच्या माध्यमातून जोपासलेला आध्यात्मिक वारसा म्हणजे पद्मश्री विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या संस्कारांचा भाग आहे. या परिसराने सर्व क्षेत्रांत यशस्वीपणे काम केले. ग्रामीण शिक्षणाचा पाया मजबूत करताना जिल्हा परिषद शाळेचा बीओटी तत्त्वाने विकास करण्याचा नवा मापदंड घालून दिला.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. विखे यांनीही मनोगत व्यक्त केले.

शालेय शिक्षणात कृषी!
आता शालेय शिक्षणात कृषी अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेती क्षेत्राचे महत्त्व, शेतकर्‍यांचे दु:ख नव्या पिढीला समजावे, हाच दृष्टिकोन यामागे असल्याचे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

 

Back to top button