नगर शहरात महावितरणमुळे कृत्रिम पाणीटंचाई ! महिन्यात तब्बल 31 वीजपुरवठा खंडित | पुढारी

नगर शहरात महावितरणमुळे कृत्रिम पाणीटंचाई ! महिन्यात तब्बल 31 वीजपुरवठा खंडित

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. वीजवितरणकडून वीजपुरवठा खंडित झाल्याने धरणातील पाणीउपसा विस्कळित होते. परिणामी पाण्याच्या टाक्या भरत नाहीत. त्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. गेल्या महिन्यात तब्बल 31 वेळा वीजपुरवठा खंडित झाला. अहमदनगर शहराची तहान भागविण्यासाठी मुळा धरणातून पाणी आणले जाते. मुळा धरण ते विळद, विळद ते वसंत टेकडी असे मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाते. मुळा धरण अथवा विळद येथील विद्युत पंपांचा वीजपुरवठा पाच मिनिटे जरी खंडित झाला, तरी पाणीउपसा सुरळीत करण्यासाठी सुमारे अडीच तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे शहरातील पाण्याच्या टाक्या भरणे मुश्किल होते.

ऐन उन्हाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीटंचाईचे कृत्रिम संकट निर्माण होत आहे. त्यामुळे दैनंदिन पाणीउपशाचे नियोजन करून ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शहरासह सर्व उपनगर भागास नियमित पाणीपुरवठा करण्याचा व पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा महापालिकेचा आटोकाट प्रयत्न आहे. परंतु, वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन पाणीउपसा अनियमित होऊन शहरातील वितरणासाठीच्या टाक्या वेळेत भरता येत नाहीत. परिणामी सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

वीजवितरणशी वारंवार पत्रव्यवहार

सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंत्यांना महापौर व आयुक्तांमार्फत वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याची मालिका सुरूच आहे. त्यामुळे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग जेरीस आला आहे.

यंत्रणा सुरळीत होण्यास तीन तासांचा अवधी

मुळा धरणातून पाणीउपसा करणार्‍या पंपांचा वीजपुरवठा दि. 5 एप्रिल ते 2 मे 2023 पर्यंत सुमारे 31 वेळा खंडित झाला आहे. 7 एप्रिल रोजी दिवसभरात पाच वेळा वीजपुरवठा खंडित झाला. एक महिन्यात सुमारे 14 तास वीजपुरवठा खंडित झाला होता. मुळा धरण व विदळ येथे सुमारे 9 विद्युत पंप आहेत. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर एक विद्युत पंप सुरू करता येतो. त्यानंतर सुमारे 10 ते 15 पंधरा मिनिटांच्या विलंबाने दुसरा पंप सुरू करावा लागतो. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत सुमारे दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो.

Back to top button