नगर : विनयभंगाबद्दल तरुणाला दोन वर्षे सक्तमजुरी

नगर : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात रेहान ऊर्फ मोहम्मद अंजर रिजवान शेख (वय 19, रा. शेंडी, ता. नगर) याला न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी हा निकाल दिला. अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्याच्या फिर्यादीवरून 18 जुलै 2022 रोजी भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. भिंगारचे पोलिस हवालदार गोर्डे यांनी मुलीचा शोध घेतला असता ती आरोपी रेहानसोबत सापडली होती.
मुलीने जबाब देताना सांगितले, की तुझ्याशी लग्न करावयाचे आहे, असे सांगून रेहान बळजबरीने घेऊन गेल्याचे, तसेच त्याच्या नातेवाइकाकडे राहत असताना विनयभंग केल्याचेही सांगितले. गुन्ह्यात वाढीव कलमे लावून पोलिस उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी सहा साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी आर. व्ही. बोर्डे यांनी सहकार्य केले.