नगर : भिंगार कॅन्टोन्मेंटचा अहवाल शासनाकडे ! | पुढारी

नगर : भिंगार कॅन्टोन्मेंटचा अहवाल शासनाकडे !

नगर :  पुढारी वृत्तसेवा : भिंगार कॅन्टोन्मेट बोर्ड अहमदनगर महापालिकेत समावेशित करण्यासाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाने महापालिकेला पत्र पाठवून अहवाल मागविला होता. त्यानुसार महापालिकेने शासनाला अहवाल दिला आहे. मात्र, भिंगारचा महापालिकेत समावेश करावा की नाही याबाबत मनपाच्या सर्वसाधारण सभेत विषय चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सत्रांकडून मिळाली. देशातील सुमारे 62 कँटोन्मेट बोर्ड जवळच्या महापालिकेत समावेशित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातील काही कँटोन्मेंट बोर्ड केंद्र सरकारने थेट हस्तक्षेप करीत महापालिकेत समावेश करण्याच्या सूचना दिल्याचे बोलले जात आहे.

कँटोन्मेट बोर्ड लष्करी तळाच्या अखत्यारित येत असल्याने विकासाला खीळ बसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून स्थानिक नागरिक कँटोन्मेंट बोर्डाचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी करीत होते. अहमदनगर महापालिकेजवळ असणारा भिंगार कँटोन्मेट बोर्डही महापालिकेत समावेशित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह सर्वपक्षीय नेत्यांची आहे. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलन, निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे. दरम्यान, राज्यस्तरावरून कँटोन्मेंट बोर्ड महापालिकेत समावेश करण्याबाबत पत्र आले होते.

त्यात कँटोन्मेंट बोर्ड लोकसंख्या, क्षेत्रफळ अशा बाबींची विचारणा झाली होती. त्यानुसार आता महापालिका प्रशासनाने राज्य सरकारला अहवाल पाठविला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार भिंगार महापालिकेत समावेशित करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव आवश्यक आहे. त्यानुसार प्रशासन सर्वसाधारण सभेत ठराव ठेवणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये भिंगार शहर महापालिकेत समावेशित करण्याबाबत हालचाली होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात पडेल भर
भिंगार शहराचा महापालिकेत समावेश केल्यास उत्पन्नात भर पडणार आहे. कारण महापालिकेच्या जलवाहिनीवरून भिंगार शहराला पाणी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे भिंगार शहर समावेशित झाल्यास मनपाचा फायदा होणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.

भिंगार कँटोन्मेंट बोर्डाचा महापालिकेत समावेश करण्याबाबत अहवाल पाठविला आहे. हा विषय सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवला जाणार आहे.
                                                              – डॉ. पंकज जावळे,आयुक्त, मनपा

Back to top button