अधिकार्‍यांनो, दबावाला बळी पडू नका : आ. बाळासाहेब थोरात | पुढारी

अधिकार्‍यांनो, दबावाला बळी पडू नका : आ. बाळासाहेब थोरात

श्रीरामपूर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील विकास कामे बंद पाडण्याचे काही लोक उद्योग करीत आहेत. सत्ता येते आणि जाते, त्यामुळे अधिकार्‍यांनी कुणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करावे, अशा कठोर शब्दांमध्ये माजी महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना सूचना दिल्या. संगमनेर शहरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात आयोजित करण्यात आलेल्या टंचाई आढावा खरीप पूर्व हंगाम बैठकीत ते बोलत होते. यावेळी अकोलेचे आ. डॉ. किरण लहामटे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजित तांबे, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे आदी उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, राजकारणासाठी शासनाच्या योजनांचे काही लोक काम बंद पाडण्याचे काम करीत आहेत, परंतु अधिकार्‍यांनी त्यांच्या दबावाला बळी न पडता शासनाच्या निधीतून मंजूर झालेली सर्व कामे अधिक दर्जेदार होण्यासाठी अधिकार्‍यांनी मनापासून काम करावे, असा सल्ला त्यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांना दिला.

यावर्षी एलनिनोच्या प्रभावामुळे उशिराने येणार्‍या पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने मागेल त्यांना रोजगार हमीचे काम व मागणीनंतर तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना आ. थोरात यांनी प्रशासनाला केल्या.
जलजीवन व जीवन प्राधिकरणच्या योजनांची कामे ज्या ठिकाणी सुरू आहेत ती बंद होता कामा नये. नळ योजनेची कामे दुरुस्तीने पुर्ण करून घ्या. पिण्याचे पाणी रोजगार हमीची कामे आणि चारा याबाबत प्रशासनाने अधिक सतर्क रहावे, असे आ. थोरात यांनी सांगितले.
आ. डॉ. किरण लहामटे म्हणाले, लोकांच्या तक्रारी येणार नाहीत, यासाठी अधिकार्‍यांनी काम केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, मिराताई शेटे, अजय फटांगरे, गणपतराव सांगळे यांनी आपल्या भागातील विविध प्रश्न उपस्थित केले. टंचाईबाबत जाहीर केलेल्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकार्‍यांसह शासकीय विभागांचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कामे चांगली झाल्यास पाण्याची समस्या येणार नाही !
आ. डॉ. किरण लहामटे म्हणाले, जल जीवन व जीवन प्राधिकरणाची कामे चांगली झाली तर आगामी काळामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या येणार नाही. आ. बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडीने अत्यंत चांगल्या योजना राबविल्या. त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा.

Back to top button