माझ्या यशात रामदास फुटाणेंचे योगदान : निर्माते नागराज मंजुळे | पुढारी

माझ्या यशात रामदास फुटाणेंचे योगदान : निर्माते नागराज मंजुळे

जामखेड : पुढारी वृतसेवा :  माझ्या यशामध्ये कवी रामदास फुटाणे यांचे मोठे योगदान असून, ते माझे आदर्श असल्याचे मत चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. जामखेडचे भूमिपुत्र ज्येष्ठ कवी, दिग्दर्शक, निर्माते रामदास फुटाणे यांचा ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक रमेश गुगळे, चित्रपट निर्माते रणजीत गुगळे, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, अरूण चिंतामणी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्रा. मधुकर राळेभात, अशोक सिंगवी, सुरेश भोसले, महेश नगरे, मंगेश आजबे, डॉ. प्रताप गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार दत्ता वडे, अमित चिंतामणी आदी उपस्थित होते.

नागराज मंजुळे म्हणाले, जामखेडचे भूमिपुत्र ज्येष्ठ कवी व दिग्दर्शक रामदास फुटाणे यांची जगात ख्याती आहे. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षाने भरले आहे. त्यांनी काढलेला पहिला चित्रपट सामना खूप गाजला. चित्रपट काढायला पैसे लागतात; परंतु या माणसाकडे पैसे नसतानाही पहिला चित्रपट काढला. नवीन पिढीला फुटाणेकडून खूप काही घेण्यासारखा आहे. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना पुरस्कार दिले. त्यांच्यामुळे अनेक पुरस्कार आजही टिकून आहेत. जामखेडमधील रामदास फुटाणे व चित्रपट निर्माते रंजीत गुगळे हे दोन्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असल्याचा पुनरुच्चार मंजुळे यांनी केला.

रामदास फुटाणे म्हणाले, माझ्या कार्याची पावती म्हणून मला जगभरात अनेक पुरस्कार मिळाले. अनेक सत्कार झाले; परंतु गावकर्‍यांनी केलेला सत्कारामध्ये विशेष प्रेम असतं. गावातल्या लोकांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते. यावेळी रमेश गुगळे, गिरीश कुलकर्णी यांचे भाषण झाले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी रवींद्र कडलग, मुकुंद राऊत, गौरव फुटाणे, दिगांबर फुटाणे, ऋतुराज फुटाणे व अमोल फुटाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button