पाथर्डीत गोरगरिबांना मोफत आरोग्यसेवा ; बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन | पुढारी

पाथर्डीत गोरगरिबांना मोफत आरोग्यसेवा ; बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन

पाथर्डी तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गरीब कुटुंबांतील व्यक्तींना मोफत आरोग्यसेवा मिळावी, या हेतूने मोफत तपासणी, उपचार व औषधे अशी सुविधा आपला दवाखान्यामार्फत सुरू करण्यात आली. त्याचा गोरगरीब जनतेने घ्यावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात मोफत तपासणी, मोफत उपचार व मोफत औषध या सेवेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, बजरंग घोडके, महेश बोरुडे, डॉ. रमेश हंडाळ, मनीषा उदमले, तालुका आरोग्याधिकारी डॉ. भगवान दराडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, अय्युब सय्यद, सोमनाथ गर्जे, दत्ता ढवळे, पप्पू दहिफळे आदी उपस्थित होते. पाथर्डी शहरातील माणिकदौंडी रस्त्यावरील आसरानगर भागात व कसबा विभागात असे दोन आपला दवाखाने राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. यात रक्त व लघवी तपासणी केली जाणार आहे.

आव्हाड म्हणाले, की शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विकास हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपला दवाखाना ही संकल्पना शहरात राबविली जाणार आहे. याप्रसंगी डॉ. रामप्रसाद गायकवाड, डॉ. सोनाली पवार उपस्थित होते. दवाखान्यात रुग्णांच्या सेवेसाठी एक डॉक्टर आणि पाच कर्मचारी असणार आहे.

Back to top button