नगर जिल्ह्यात अवकाळीचे दोन महिन्यांत दहा बळी ; मिळणार प्रत्येकी चार लाखांची मदत | पुढारी

नगर जिल्ह्यात अवकाळीचे दोन महिन्यांत दहा बळी ; मिळणार प्रत्येकी चार लाखांची मदत

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने पिकांबरोबरच फळबागांचे अतोनात नुकसान केले. यंदाचा अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटासह दाखल झाला. दोन महिन्यांत वीज अंगावर कोसळून जिल्ह्यातील दहा जण दगावले. दगावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तालुकास्तरावर मदतीची कार्यवाही सुरु आहे. जिल्हाभरात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अधिक पाऊस झाला. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम देखील जोमात होता. रब्बी पिके काढणीला येताच मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाची एन्ट्री होते.

दोन-तीन दिवस वादळी वारा आणि गारपिटीसह हजेरी लावत पाऊस निघून जातो. यंदा मात्र या पावसाने तब्बल दोन महिने मुक्काम ठोकला आहे. वादळी वारा आणि गारपिटीसह पडलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली रब्बी पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे आतापर्यंत 40 ते 45 हजार शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाने बाधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाकडे जवळपास 50 कोटींचा निधी मागितला आहे.

यंदाच्या अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात आगमन केले. त्यामुळे ठिकठिकाणी वीज कोसळली गेली. या अपघातात जिल्हाभरातील दहा जण ठार झाले. यामध्ये एका दहा वर्षाच्या मुलांचा समावेश आहे. याशिवाय वीज कोसळून एक जण जखमी झाल्याची नोंद आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधीतून 4 लाख रुपयांची मदत दिली जात आहे. राज्य शासनाने मदतीबाबत 18 एप्रिल 2023 मध्ये अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार तालुकास्तरावर मदत देण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे.

 

Back to top button