रस्त्यांच्या 17 कोटींच्या कामांना लवकरच प्रारंभ ; आ. आशुतोष काळे यांची माहिती | पुढारी

रस्त्यांच्या 17 कोटींच्या कामांना लवकरच प्रारंभ ; आ. आशुतोष काळे यांची माहिती

कोळपेवाडी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी निधि मिळावा, यासाठी केलेल्या प्रयत्नातून अनेक रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. त्यापैकी तीन महत्वाच्या रस्त्यांच्या 17 कोटींच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष बहुतांश प्रमाणात भरून निघाला असून उर्वरित रस्त्यांच्या विकासासाठी लवकरात लवकर निधी मिळून या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

त्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या मतदारसंघातील तीन महत्वाच्या रस्त्यांच्या 17 कोटींच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख ते बहादरपूर या जवळपास 5 किलोमीटर रस्त्यासाठी 4 कोटी 11 लक्ष 90 हजार, तसेच मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा-नपावाडी या साडे पाच किलोमीटर रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा 2 योजना (सर्वसाधारण) (डीपीसी) अंतर्गत 5.20 कोटी व पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्र.जि.मा.84 ते पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी रस्ता (7.81 कोटी) अशा एकूण जवळपास 17 कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.

यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्यामुळे नागरिकांना होणार्‍या त्रासातून मुक्तता होणार आहे. पुणतांबा-नपावाडी, रांजणगाव देशमुख ते बहादरपूर व पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी या प्रलंबित असलेल्या रस्त्यांना आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे लवकरच रस्त्याच्या कामास प्रारंभ होवून खराब रस्त्याच्या त्रासातून मुक्तता होणार असल्यामुळे या सर्व गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कोपरगावातील रस्त्यांची कामे मार्गी लावणार
खराब रस्त्यांचा त्रास सहन करीत असलेल्या नागरिकांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी कोपरगाव शहरासह कोपरगाव मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते विकसित केले आहेत. सर्वच खराब रस्त्यांना निधी मिळवून लवकरच उर्वरित रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Back to top button