नगर जिल्ह्यातील ‘त्या’ 22 वाड्यांसाठी सहा टँकर !

नगर जिल्ह्यातील  ‘त्या’ 22  वाड्यांसाठी सहा टँकर !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  यंदाच्या उन्हाळ्यात काही भागात अवकाळीने हजेरी लावली असली, तरी काही ठिकाणी मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळाही तीव्र होताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 22 वाड्यावस्त्यांवरील 10 हजार ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केलेला आहे. संगमनेरात चार, अकोले एक आणि पाठोपाठ पारनेर तालुक्यातही एक टँकर सुरू झाला आहे. संगमनेरच्या पठार भागात मार्चच्या प्रारंभीच चार टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पाच गावे आणि त्यानंतर अकोले तालुक्यातही एक 16 वाड्यांना टँकरने मोठा दिलासा मिळाला आहे.

चौधरवाडी, डोळासणे, कर्जुले पठार, गुंंजाळवाडी पठार, पोखरी बाळेश्वर यांचा समावेश असून, येथील 6148 ग्रामस्थांना चार टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. अकोले तालुक्यातही एक टँकर सुरू आहे. देवठाण परिसरातील पाच वाड्यांना हा टँकर नियमितपणे पाणीपुरवठा करत आहे. या ठिकाणची 1710 लोकवस्तीची या टँकरद्वारे प्रशासनाकडून तहान भागविली जात आहे. त्यातच गत आठवड्यातच पारनेर तालुक्यातील पुणेवाडी परिसरातून टँकरची मागणी आली होती. प्रशासनाने तत्काळ या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. या परिसरातील 2971 लोकवस्तीमध्ये आज टँकरने पाणी दिले जात असल्याने ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे हे टँकरचा स्वच्छ व नियमितचा पाणीपुरवठा, गावांची येणारी मागणी, याकडे लक्ष ठेवून आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news