बाजार समितीचा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा ; आगामी निवडणुकांत दोन्ही आमदारांचा लागणार कस | पुढारी

बाजार समितीचा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा ; आगामी निवडणुकांत दोन्ही आमदारांचा लागणार कस

दीपक देवमाने : 

जामखेड (नगर ) : कर्जतबरोबर जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 9 जागा मिळाल्याने मतदारांनी सत्तेचा समतोल साधला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समान जागांमुळे सभापतीपदाचा तिढा वाढला आहे. आता, जामखेडमध्ये ईश्वर चिठ्ठी निघणार की, फोडाफोडीचे राजकारण रंगणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, मतदारांनी समतोल ठेवल्याने दोन्ही आमदारांना ते राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जनतेच्या मनात बहुमत मिळविण्यासाठी दोन्ही आमदारांची कस लागणार आहे. बाजार समिती निवडणुकीतून दोन्ही आमदारांना मतदारांनी आत्मपरीक्षण करायला लावले असल्याचे निकालातून दिसून येत आहे.

जामखेड बाजार समिती निवडणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. आमदार पवार यांच्या बरोबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व सुधीर राळेभात यांनी एकत्र निवडणूक लढविली. या निवडणुकीत राळेभात बंधूंची सहकारातील पकड मजबूत राहिली आहे. तसेच, आमदार शिंदे यांनाही सहकारात काही प्रमाणात यश आले आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात त्यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. आमदार शिंदे यांचे सहकारी प्रा.सचिन गायवळ यांची या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका राहिली आहे. दोन्ही आमदारांना स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सभापती पदाचा पेच राहणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत दोन माजी सभापती, दोन तालुकाध्यक्ष, माजी संचालकांसह विविध पदाधिकारी नशीब आजमावत होते. यामध्ये आमदार शिंदे गटाकडून माजी सभापती गौतम उतेकर व आमदार पवार गटाकडून सुधीर राळेभात यांनी विजय मिळवित वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला. तर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांनी या निवडणुकीत विजय मिळवित संघटन कौशल्य दाखविले आहे.

राळेभात बंधूंची सहकारात पकड
स्व.जगन्नाथ राळेभात यांनी तालुक्यात सहकारात वर्चस्व प्रस्थापित केले होते. तेच
काम जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व सुधीर राळेभात यांनी केले आहे.
बाजार समितीत वर्चस्व कायम ठेवत राळेभात बंधूंनी सहकारातील पकड मजबूत
ठेवली आहे. अमोल राळेभात यांच्या मदतीने आमदार रोहित पवार यांनी सोसायटी मतदार संघावर वर्चस्व राखले.

प्रा. सचिन गायवळांच्या राजकीय एन्ट्रीला यश
प्रा.सचिन गायवळ यांनी पहिल्यांदाचा राजकारणात एन्ट्री केली अन् या एन्ट्रीला यश देखील आले. आमदार शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत काम केले. आमदार शिंदे गटाला निवडणुकीत यश मिळाले आहे.

पवारांचे ग्रा. पं. मतदारसंघात अपयश
आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत मतदारसंघात चार शिलेदार उभे केले होते. मात्र, या मतदारसंघात एकही जागा त्यांच्या गटाला मिळाली नाही. त्यांना ग्रामपंचायत मतदारसंघात सपशेल अपयश आले असल्याचे दिसत आहे.

Back to top button