नगर : वाळकीत हाणामारीत एकाचा खून ; फरार आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना | पुढारी

नगर : वाळकीत हाणामारीत एकाचा खून ; फरार आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना

वाळकी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील वाळकी येथे रविवारी (दि.30) सायंकाळी दोन गटांत तुफान हाणामार्‍या झाल्या. या हाणामारीत नाथा ठकाराम लोखंडे (वय 49, रा. वाळकी ता.नगर) हे मयत झाले. त्यांच्या खूनप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, यातील पोलिसांनी पकडलेल्या शुभम उर्फ भोले जनार्धन भालसिंग याला न्यायालयाने 4 दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, मोक्काच्या गुन्ह्यात कारागृहातून पॅरोलवर सुटून पुन्हा हजर न होता फरार झालेल्या विश्वजित कासार याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. वाळकीतील कासार मळा येथे पैशांच्या वादातून लोखंडे व कासार यांच्यात हाणामारी झाली होती. या हाणामारीत नाथा ठकाराम लोखंडे हे मयत झाले होते.

त्यांचा मुलगा अनुराज नाथा लोखंडे (रा. कासार मळा, वाळकी, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून इंद्रजित रमेश कासार, शुभम उर्फ भोले जनार्धन भालसिंग, विश्वजित रमेश कासार व अशोक उर्फ सोनू गुंड (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा.वाळकी ता.नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपी इंद्रजित रमेश कासार व शुभम उर्फ भोले जनार्धन भालसिंग या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी जखमी इंद्रजित यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर, भालसिंग यास न्यायालयाने 4 दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

या हाणामारीत इंद्रजित कासार हा जखमी झालेला असल्याने त्याने रुग्णालयात पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी सोन्या शिवाजी लोखंडे, अनिल नाथा लोखंडे, रवि नाथा लोखंडे, नाथा ठकाराम लोखंडे, शिवाजी ठकाराम लोखंडे (सर्व रा, वाळकी ता.नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यातील एक आरोपी विश्वजित रमेश कासार हा मोक्काच्या गुन्ह्यात कारागृहात असताना वैद्यकीय उपचारासाठी पॅरोलवर सुटलेला होता. परंतु, तो पुन्हा हजर न होता फरार झालेला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या घटनेमुळे वाळकीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Back to top button