

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील प्रवरा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करताना महसूल विभागाने जेसीबीसह १५ ब्रास वाळूचा साठा जप्त केला.
संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील प्रवरा नदी पात्रामध्ये चेतन साकुरे हा जेसीबीच्या माध्यमातून अवैधरित्या वाळूचा उपसा करत असल्याची गुप्त माहिती खबर्यामार्फत नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना समजली. रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, तलाठी रामदास मुळे, बाबा साहेब नरवडे, युवराजसिंग जारवाल हे सर्वजण खांडगावला पोहोचले.
महसूल पथकाला पाहून चालक हा जेसीबी घेऊन पळून चालला होता. मात्र, महसूल पथकाने पाठलाग करुन जेसीबी पकडला आहे. त्यानंतर हा जेसीबी संगमनेर येथील पोलिस वसाहतीमध्ये आणून लावला आहे. त्याच बरोबर जेसीबीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात वाळूचा साठा करून नदी पात्रालगत ढीग लावण्यात आला होता.
महसूल पथकाने सोमवारी प्रवरा नदी पात्रात जाऊन उत्खनन केलेल्या वाळूचा पंचांसमक्ष पंचनामा केला आहे. अंदाजे वीस लाख रूपये किंमतीचा हा जेसीबी आहे. त्याच बरोबर वाळूची वाहतूक करणारे वाहने वाळू तस्करांनी घटनास्थळावरुन नेली आहेत. त्यामुळे नेमकी किती वाहने होती, हे मात्र समजू शकले नाही. आता महसूल विभागाने पकडलेल्या वाहन चालकांवर कुठल्या प्रकारची कारवाई करतात, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.