नगर: कर्जतनंतर जामखेडमध्येही सत्तेचा समतोल, बाजार समितीत भाजप अन् राष्ट्रवादी काँगे्रसला प्रत्येकी 9 जागा | पुढारी

नगर: कर्जतनंतर जामखेडमध्येही सत्तेचा समतोल, बाजार समितीत भाजप अन् राष्ट्रवादी काँगे्रसला प्रत्येकी 9 जागा

दीपक देवमाने

जामखेड (नगर) : तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत कर्जतचीच पुनरावृत्ती झाली असून, मतदारांनी येथेही सत्तेचा समतोल राखला आहे. आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्या गटांना प्रत्येकी 9 जागा मिळाल्या आहेत.

बाजार समिती निवडणुकीत आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात विरूद्ध आमदार राम शिंदे यांच्या गटांमध्ये चांगलीच राजकीय चुरस पाहायला मिळाली. दोन्ही गटाकडून तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यामुळे उमेदवारांनी देखील व्यक्तिगत भेटीगाठींवर जोर दिला होता. या चुरशीच्या निवडणुकीत सेवा सोसायटी मतदारसंघात 11 जागांपैकी राष्ट्रवादीला 7 जागा , तर भाजपला 4 जागा मिळल्या आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातील 4 ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. हमाल मापडी मतदारसंघातील एक जागाही भाजपने जिंकली आहे. तसेच, व्यापारी मतदारसंघाच्या 2 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपला प्रत्येकी 9 जागा मिळाल्या आहेत. कर्जत-जामखेड हा मतदारसंघ असल्याने दोन्ही आमदारांच्या गटाला समान जागा देत मतदारांनपी सत्तेचा समतोल साधल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सभापती निवड ही चिठ्ठीवर होणार की फोडाफोडीचे राजकारण रंगणार, याकडे लक्ष लागून आहे.

सोसायटी महिला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही महिलांनी बाजी मारली आहे. तसेच इतर मागासवर्ग मतदारसंघात भाजपच्या डॉ. गणेश जगताप यांनी बाजी मारली. तर, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघात राष्ट्रवाद चे नारायण जायभाय विजयी झाले आहेत. तसेच ग्रामपंचायतच्या सर्व साधारण मतदारसंघात दोन्ही जागा भाजपला मिळाल्या आहेत. यामध्ये शरद कार्ले, तर दुसरे वैजीनाथ पाटील यांनी बाजी मारली आहे.

आमदार रोहित पवार यांच्या बरोबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व सुधीर राळेभात यांनी एकत्र येत ही निवडणूक विली. तर, आमदार राम शिंदे यांच्या बरोबर नुकतीच राजकारणात एन्ट्री मारलेले सामाजिक कार्यकर्ते प्रा.सचिन गायवळ यांनी एकत्र येत निवडणूक लढविली. त्यामुळे ही निवडणूक आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर परिणाम करणारी ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमदार शिंदे व आमदार पवार यांची प्रतिष्ठा ापणाला लागली होती. या निकालाने दोन्ही आमदारांना बहुमत न देता दोघांनाही समान जागा दिल्याने जनतेचा रोख त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

विजयी उमेदवार व मिळालेली मते

राष्ट्रवादी काँग्रेस  – सुधीर राळेभात (360), अंकुश ढवळे (264), सतीश शिंदे (261), कैलास वराट (278), नारायण जायभाय (314), रतन चव्हाण (319), अनिता शिंदे (314), सुरेश पवार (214) व राहुल बेदमुथा (192).

भाजप – गौतम उतेकर (269), सचिन घुमरे (335), विष्णू भोंडवे (270), शरद कार्ले (313), वैजीनाथ पाटील (266), नंदकुमार गोरे (288), सीताराम ससाणे (243), रवींद्र हुलगुंडे (133), डॉ. गणेश जगताप (325).

Back to top button