नेवासा बाजार समितीत भाजपचा धुव्वा, आमदार गडाख गटाचे सर्व उमेदवार विजयी; मुरकुटे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह | पुढारी

नेवासा बाजार समितीत भाजपचा धुव्वा, आमदार गडाख गटाचे सर्व उमेदवार विजयी; मुरकुटे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

कैलास शिंदे

नेवासा (नगर): तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने सर्व 18 जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवित एकहाती सत्ता मिळविली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व विठ्ठलराव लंघे यांना मोठी ताकद देऊनही भाजपच्या उमेदवाराचे पानिपत झाले.

रविवारी सकाळी 8 वाजता मतदानाला शहरातील मराठी शाळेत प्रारंभ झाला होता. दुपारी 12 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान झाले होते. सकाळपासून आमदार शंकरराव गडाख व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे शहरात तळ ठोकून होते. दरम्यान 3301 मतदारांपैकी 3116 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 94.39 टक्के मतदान झाले.

नेवासा बाजार समितीच्या 18 जागांसाठी 30 एप्रिलला निवडणूक झाली. या निवडणुकीत गडाख गटाचे हमाल मापाडीमधील रमेश भाऊसाहेब मोटे हे यापूर्वीच बिनविरोध झालेले आहेत. उरलेल्या 17 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात होते. दोन अपक्षांचा त्यात समावेश होता. तसेच, व्यापारी मतदार संघातील भाजपचे उमेदवार सिद्दिक गणी चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वीच गडाख गटाला पाठिंबा देवून त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मतदान झाल्यानंतर 5 वाजता नेवासा बाजार समितीच्या आवारातील गोडाऊनमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी गोकुळ नांगरे व सहाय्यक म्हणून सुखदेव ठोंबरे, सचिव देवदत्त पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली.

आमदार गडाख यांच्यावर नाराजी आहे, त्यांनी कामे केली नाही, असा विरोधकांनी प्रचार चालू केला होता. परंतु, त्याकडे गडाख यांनी दुर्लक्ष करत मोठे मेळावे न घेता स्वतः थेट मतदारांशी संपर्क केला. बाजार समितीची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीमच होती. त्यात मुरकुटे व लंघे यांना मतदारांनी साफ नाकारले असून, आमदार गडाख यांच्यावर विश्वास दाखविल्याचे दिसून आले. मागील निवडणुकीपेक्षा या वेळेस गडाख गटाचे मताधिक्य वाढले आहे.

माजी आमदार मुरकुटे उमेदवारी देऊन सोडून देतात, कार्यकर्त्यांना बळ देत नाहीत. फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आमचा वापर करतात, असा जाहीर आरोप करीत भाजपच्या उमेदवारानेच करून गडाख गटात प्रवेश केला होता. निवडणुकीच्या अगोदर भाजपच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उमेदवारी नाकारली होती. माजी आमदार मुरकुटे यांच्या गावातील तसेच कुटुंबातील अनेकांनी त्यांची साथ सोडली. आमदार गडाख यांनी तालुक्यात मंजूर करून आणलेली 90 कोटींची कामे व नेवासा शहरातील 30 कोटींची कामे कुणी थांबविली, या कामांना कुणाच्या सांगण्यावरून स्थगिती मिळाली, याची चर्चा होत आहे. याचाही फटका मुरकुटे यांना या निवडणुकीत बसल्याचे बोलले जात आहे. गारपीट, अवकाळीमुळे शेतीचे नुकसान झाले असल्याने शेतकरी अडचणीत आला असल्याने विजयी उमेदवारांनी गुलाल उधळू नये, फटाके फोडू नये व गावात शांतता ठेवावी, असे जाहीर आवाहन आमदार गडाख यांनी केले आहे.

विजयी उमेदवार व मिळालेली मते

अमृत चंद्रचूड काळे 1130, मीराबाई पांडुरंग ढोकणे 1131, अर्जुन ऊर्फ बाळासाहेब बाजीराव नवले 1125, हरिश्चंद्र नाथा पटारे 1131, नंदकुमार लक्ष्मण पाटील 1133, अरूण पांडुरंग शिंदे 1125, अरूण दादासाहेब सावंत 1111, अश्विनी भारत काळे 1101, संगीता राजेंद्र सानप 1071, बाबासाहेब रंगनाथ आखाडे 1121, सुंदराबाई सारंगधर ढवाण 1182, बाळासाहेब मच्छिंद्र दहातोंडे 687, नानासाहेब साहेबराव नवथर 679, सुनील दिगंबर धायजे 684, गणेश पुरूषोत्तम भोरे 687, दौलतराव चंद्रकुमार देशमुख 349, संतोष तुकाराम मिसाळ 349.

नेवासा तालुक्यात गडाखच सबकुछ

माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी या निवडणुकीत एकहाती विजय मिळवून द्या, असे आवाहन सभासदांना केले होते. सभादांनी ते खरे करून दाखविले. गडाख गटाच्या ताब्यात पुन्हा बाजार समितीची निर्विवाद सत्ता देऊन नेवासा तालुक्यात गडाखच सबकुछ असल्याचे सिद्ध केले आहे.

गडाखांची मतदारांशी ‘वन टू वन’ चर्चा

आमदार गडाख यांच्यावर नाराजी असून मतदार त्यांच्या विरोधात आहे, निवडणुकीत त्यांना धोका होईल, अशी मोठी चर्चा होती. परंतु, गडाख यांनी गाव पुढार्‍यांना टाळत थेट मतदारांशी ‘वन टू वन’ चर्चा केल्याने यश मिळाले. त्यांचे विरोधक मेळावे घेत आरोप करण्यात दंग राहिले. मात्र, तालुक्यात गडाख यांचेच वर्चस्व टिकून राहिल्याचे दिसून आले

नेवासा भाजपमध्ये घडलंय बिघडलंय..

आमदार गडाख यांनी पाणी योजना, रस्ते, सभा मंडप यासाठी कोट्यवधींचा निधी आणला असून लग्न, सांत्वनपर भेटी, विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी गडाख तालुका पिंजून काढत आहेत. याउलट भाजपची सत्ता येऊनही मुरकुटे व लंघे यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी गडाख यांचे नेतृत्व मान्य केले आहे. भाजपची संघटना बांधण्यात दोघांनाही अपयश आल्याचे दिसून आले आहे.

Back to top button