नगर: राष्ट्रवादीकडून भाजपला चपराक, शेवगाव कृषी उत्पन बाजार समितीवर घुलेंचे वर्चस्व कायम | पुढारी

नगर: राष्ट्रवादीकडून भाजपला चपराक, शेवगाव कृषी उत्पन बाजार समितीवर घुलेंचे वर्चस्व कायम

शेवगाव (नगर), पुढारी वृत्तसेवा: शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर घुलेंचे वर्चस्व कायम राहिले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीत सर्व जागांवर मताधिक्याने विजय मिळवून राष्ट्रवादी काँगे्रसने भाजपाला जोरदार चपराक दिली आहे.

शेवगाव बाजार समिती निवडणुकीसाठी रविवारी (दि. 30) शांततेत मतदान सुरू झाले. सकाळी दहा वाजेपर्यंत 389 म्हणजे 17.78 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदान वाढत गेल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत 1 हजार 983 म्हणजे 90.67 मतदान होऊन अखेरीस 2 हजार 137 म्हणजे 97.71 टवके मतदान झाले. यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघात 911 पैकी 889, ग्रामपंचायत मतदारसंघात 869 पैकी 844, व्यापारी -आडते मतदारसंघात 186 पैकी 183 व हमाल -मापाडी मतदारसंघात 221 पैकी 221, अशा एकूण 2 हजार 187 पैकी 2 हजार 137 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वात जास्त 100 टक्के मतदान हमाल-मापाडी मतदारसंघात झाले.

मतदाना वेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले हे तळ ठोकून होते. माजी आमदार नरेंद्र घुले यांनी दहिगाव विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच, मतदान केंद्राला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तर, भाजपाच्या आमदार मोनिका राजळे सकाळी मतदान स्थळी होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक यू. व्ही. लकवाल, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ए. एन. लोखंडे, जी. ए. विखे यांनी काम पाहिले.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

स्व. मारूतराव घुले पाटील यांच्या विचाराने व माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने मतदारांनी पुन्हा एकदा सत्ता देऊन काम करण्याची संधी दिली आहे. सध्याच्या सरकारबाबत नाराजी असल्याने येथे महाविकास आघाडीची सत्ता आली. शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता पुढील काळात बाजार समितीचा कारभार करणार आहे, असे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सांगितले. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष, कम्युनिष्ट, शेतकरी संघटना तसेच सहकार्य करणार्‍या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

विजयी उमेदवार व मिळालेली मते

सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण – एकनाथ दिनकर कसाळ 631, गणेश बाबासाहेब खंबरे 626, अशोकराव अण्णासाहेब धस 629, जमीर अब्बासमियाँ पटेल 619, राहुल शंकरराव बेडके 632, अ‍ॅड.अनिल बबनराव मडके 627, नानासाहेब बबन मडके 615. महिला राखीव – चंद्रकला श्रीकिसन कातकडे 683, रागिनी सुधाकर लांडे 682. इतर मागासवर्गीय – हनुमान बापुराव पातकळ 664. विमुक्त जाती भटक्या जमाती – राजेंद्र शिवनाथ दौंड (679). ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण – संजय मोहन कोळगे 537, अशोक रामभाऊ मेरड 515. अनुसूचित जाती-जमाती – अरूण भास्कर घाडगे 549. दुर्बल घटक – प्रिती रामभाऊ अंधारे 534. व्यापारी-आडते – जाकीर शफी कुरेशी 153, मनोज काशिनाथ तिवारी 158. हमाल -मापाडी – प्रदीप नानासाहेब काळे 189.

Back to top button