

श्रीरामपूर(नगर); पुढारी वृत्तसेवा : एरवी कुत्र्यांचा फडशा पाडणार्या बिबट्याची कुत्र्यांच्या झुंडीने पळता भुई थोडी केली. कुत्र्यांच्या भीतीने भेदरलेल्या बिबट्याने रात्र पिंपळाच्या झाडावर काढत बचाव केला. दरम्यान, सकाळी बिबट्याला नागरिकांनी हुसकावले. झाडावरून उडी मारत पळताना त्याने पांडुरंग रामभाऊ धनवटे या वृद्धाला पंजा मारत जखमी केले. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव गावठाण परिसरात हा थरार नागरिकांनी अनुभवला.
रविवारी भल्या पहाटे आसाराम पवार यांनी झाडावर बसलेला बिबट्या पाहिला. गावात बातमी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रीरामपूर पोलिसही गावात पोहचले. सरपंच अविनाश पवार, वन अधिकारी बी. एस. गाढे, कर्मचारी जी. बी. सुरासे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, अरुण पवार, पोलिस मित्र गणेश गायकवाड यांनी अडोशाचा आधार घेत बिबट्याला हुसकाविण्याचा प्रयत्न केला. बिबट्याने झाडावरून जमिनीवर उडी मारत धूम ठोकली. जाताना बिबट्याने धनवटे यांना पंजा मारत जखमी केले.
तुषार गायकवाड, माजी सरपंच दादा झिंज, भरत पवार, बापू पवार, अरुण पवार, पांडुरंग सातपुते, पोलिस पाटील मार्था राठोड, भालेराव, वेडु पवार यांच्यासह गावकर्यांनी बिबट्यास झाडावरुन सुरक्षित उतरून निसर्गात विलीन होण्यास मदत केली.
कुत्र्यांच्या झुंडीने प्रतिकार केल्याने बिबट्या चाळीस फूट उंचीवर झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. मात्र कुत्री झाडाखालीच थांबल्याने बिबट्याला रात्र झाडावरच काढावी लागली.
शनिवारी रात्रीच्या वेळी बिबट्याने गावठाणात प्रवेश केला. कुत्र्यांच्या झुंडीने त्याचा प्रतिकार केला. जीवाच्या भीतीने बिबट्या पिंपळाच्या झाडावर चढला. तब्बल 40 फूट उंचीवर बिबट्याने रात्र झाडाच्या फांदीवर काढली. रविवारी सकाळी बिबट्याला हाकलून लावण्यासाठी गावकर्यांनी अडीच तास प्रयत्न करत त्याला पिटाळून लावले.