शशिकांत पवार
नगर तालुका : नगर तालुक्यात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने गावरान कांद्याचा अक्षरशा चिखल झाला. चारा पिके भुईसपाट झाली, तर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जेऊर व देहरे पट्टा अवकाळी पावसाने चांगलाच झोडपून काढला आहे. खरीप हंगामातील मूग, सोयाबीन, बाजरी पिकांचे अतिवृष्टीने उत्पन्न पदरी पडलेच नाही.
लाल, रांगडा, तसेच गावरान कांद्याच्या रोपांची अतिवृष्टीने वाताहात झाली. त्यातच ढगाळ वातावरण, धुक्यामुळे लाल कांदा व इतर पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. महागडी औषधांची फवारणी करत शेतकर्यांनी कसेबसे लाल कांद्याचे उत्पादन घेतले. परंतु, कवडीमोल भावाने कांदा विकावा लागल्याने शेतकर्यांची विल्हेवाट लागली.
खरीप हंगाम वाया गेल्याने त्याची भरपाई रब्बी हंगामात होईल, या आशेवर शेतकर्यांनी परत शेतीच्या मशागतीसाठी खर्च करत गावरान कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, चारा पिके, भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्वच पिकांना ढगाळ वातावरण अन् धुक्याचा चांगलाच फटका बसला. भाजीपाल्याला भाव न मिळाल्याने उभ्या पिकात शेतकर्यांवर नांगर फिरवण्याची वेळ आली.
कांदा, गहू, हरभरा, ज्वारी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतरही काही उत्पादन हाती लागेल अशी अपेक्षा होती. मात्र, मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ वारा अन् गारपिटीने सर्व होत्याचे नव्हते केले. जेऊर परिसरात घरांचे पत्रे, तसेच जनावरांच्या गोठ्याचे शेड उडून गेल्याच्या घटना घडल्या.
मार्च महिन्यातील गारपीटीचा फटका संपूर्ण तालुक्याला बसला होता. काढणीला आलेला कांदा, गहू, चारा पिकांची वाताहात झाली तर संत्रा, आंबा फळबागांची फळगळती होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच तालुक्यातील जेऊर, देहरे पट्ट्यात शुक्रवार व शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतात काढून पडलेल्या कांद्याचा चिखल झाला आहे.
चारा पिके भुईसपाट होऊन मोठे नुकसान झाले आहे. देहरे पट्ट्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने कांदा, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेथील कांदा पिकात नांगर घालण्यात आला, तर जेऊर पट्ट्यात काढून ठेवलेला कांदा शेतातच असल्याने त्याचा अक्षरशः चिखल झाला आहे. तसेच, कांद्याच्या गोठाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले नसल्याचा आरोप शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.
अवकाळी पावसाने भिजलेला कांदा वखारीत टिकणार नाही. बाजारात विक्रीसाठी पाठवावा तर त्याला भाव नाही. अशा परिस्थितीत काय करावे अशा मनस्थितीत शेतकरी अडकला. यावर्षीचा खरीप व रब्बी हंगाम वाया गेल्याने शेतकर्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. तरी, नुकसान झालेल्या सर्व शेतकर्यांचे पंचनामे करून तत्काळ मदत मिळण्याची मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.
पूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. नव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून पंचनामे करण्यात येणार आहेत.
– संजय शिंदे, तहसीलदार, नगर तालुका.
अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा फार्स न करता प्रत्यक्षात मदत मिळणे गरजेचे आहे. संपूर्ण वर्षातील पिके तोट्यात गेल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले. नुकसान झालेल्या शेतकर्यांना तत्काळ मदत मिळणे गरजेचे आहे.
– भीमराज मोकाटे, सरपंच, इमामपूर.
देहरे पट्ट्यात मार्च महिन्यातील गारपिटीने संपूर्ण होत्याचे नव्हते केले. गहू, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर कांद्याच्या पिकांत नांगर फिरवावा लागला. शेतकर्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
-संजय लांडगे, शेतकरी, देहरे.
जेऊर परिसरातील अवकाळीने गावरान कांद्याचे मोठे नुकसान झाले. दोन एकर कांद्याच्या उत्पादनासाठी सुमारे एक लाखाचा खर्च आला. खर्च ही वसूल होणार नाही. पिके तोट्यात गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला.
– बाळासाहेब देशमुख, शेतकरी, जेऊर.