कोंभळी : वादळी पावसाने खांडवीत द्राक्षबाग उद्ध्वस्त | पुढारी

कोंभळी : वादळी पावसाने खांडवीत द्राक्षबाग उद्ध्वस्त

कोंभळी (नगर) : काल (शनिवारी) दुपारी वादळी पाऊस व गारपिटीने कर्जत तालुक्यातील खांडवी परिसरात कहर केला. गारपिटीने द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाली. बागेच्या नुकसानीने शेतकर्‍याला जबर आर्थिक फटका बसला आहे. खांडवी मधील भवानीनगर परिसरातील शेतकरी नेमीचंद बाबासाहेब तापकीर यांच्या अडीच एकर द्राक्षबागेचे गारपिटीने मोठे नुकसान झाले. या शेतकर्‍याचे सुमारे 50 ते 55 लाख रुपयांचे नुकसान झाल्याच अंदाज आहे.

 

अवकाळीने रावसाहेब तापकीर यांच्या एक एकर डाळिंब बागेचे, कैलास तापकीर यांच्या लिंबू बागेचे नुकसान झाले. लक्ष्मण तापकीर यांच्या घरकुलाचे पत्रे उडाले. काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. कुंडलिक तापकीर यांचा सुमारे 200 क्विंटल कांदा भिजला. डाळिंब बागेत फळांची वादळाने पडझड झाली. बाळासाहेब तापकीर यांचे टोमॅटो व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. वाकणवाडी येथील संजय खुडे यांच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत.

तापकीर कुटुंबीयांचा टाहो.

जीवापाड जपलेली, हातातोंडाशी आलेली द्राक्ष बाग निसर्गाने हिरावल्याने तापकीर कुटुंबीयांनी टाहोच फोडला. बाग नेण्यासाठी व्यापारी येणार होते, पण त्याआधीच अवकाळीने डाव साधल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते.

Back to top button