थोरातांचा गड अभेद्य; नगरमध्ये मविआचा डंका, तर कर्जतला भाजप-राष्ट्रवादीला समसमान कौल | पुढारी

थोरातांचा गड अभेद्य; नगरमध्ये मविआचा डंका, तर कर्जतला भाजप-राष्ट्रवादीला समसमान कौल

नगर; पुढारी वृत्तसेवा : बाजार समित्यांच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यात मविआने बाजी मारत वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले. संगमनेरमध्ये माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचा गड अभेद्य असल्याचे मतमोजणीनंतर समोर आले. थोरात यांचे परंपारिक विरोध महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कडवे आव्हान उभे केल्यानंतरही संगमनेरच्या मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले.

नगर जिह्यातील 14 पैंकी 7 बाजार समित्यांच्या कारभारी निवडीसाठी शुक्रवारी मतदान झाले. आज शनिवारी मतमोजणीनंतर मविआची सरशी झाल्याचे दिसून आले. नगर बाजार समितीवर चौथ्यांदा भाजपचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी सर्वच्या सर्व 18 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊनही त्यांना भोपळाही फोडता आला नाही.

पाथर्डीत भाजप आमदार मोनिका राजळे या सत्ता कायम राखण्यात यशस्वी झाल्या. 18 पैंकी 17 जागांवर विजय मिळवत आ. राजळे यांनी पाथर्डी भाजपचा गड असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादीचे अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. श्रीगोंदा येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या विरोधात काँग्रेसचे राजेंद्र नागवडे-भाजप आमदार बबनराव पाचपुते यांनी मोट बांधूनही जगताप यांनी बाजार समितीवर वर्चस्व मिळविण्यात यश मिळविले. नागवडे-पाचपुते गटाला 7 तर राहुल जगताप यांच्या गटाला 11 जागा मिळाल्या.

पारनेर बाजार समितीत राष्ट्रवादीचे आ. नीलेश लंके-माजी आमदार विजय औटी यांच्या एकीने भाजपप्रणित मंडळाचा धुव्वा उडाला. सर्वच्या सर्व 18 जागा जिंकत लंके-औटी जोडीने पारनेरचे वर्चस्व सिध्द केले. कर्जतमध्ये भाजप आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात काटे की टक्कर झाली.

बाजार समितीच्या निवडणुकीत दोघांनाही समसमान (प्रत्येकी 9) कौल देत मतदारांनी सत्तेचा समतोल साधला. आता सभापती निवडीत रस्सीखेच होवून सत्ता प्रस्थापित कोण करणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून असणार आहे. राहुरी बाजार समितीत राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी वर्षानुवर्षाची सत्ता कायम राखली. राहुरीत खा. डॉ. सुजय विखे-माजी आ. शिवाजी कर्डिले एकत्र येवूनही भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

रविवारी सात बाजार समित्यांसाठी मतदान

जिल्ह्यातील 14 पैंकी 7 बाजार समित्यांचे निकाल लागले असून, त्यातील दोन भाजप, चार मविआ तर एका ठिकाणी समसमान कौल मतदारांनी दिला. उर्वरित 7 बाजार समित्यांसाठी उद्या रविवारी मतदान होऊन लगेचच मतमोजणी होणार आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता बाजार समितीसाठी रविवारी मतदान होत असून, तेथे त्यांना माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी कडवे आवाहन उभे केले आहे.

Back to top button