कचर्‍यामुळे पुष्पावती नदीकिनारी अस्वच्छता; निघोज ग्रामपंचायतीचा कारवाईचा इशारा | पुढारी

कचर्‍यामुळे पुष्पावती नदीकिनारी अस्वच्छता; निघोज ग्रामपंचायतीचा कारवाईचा इशारा

निघोज(नगर); पुढारी वृत्तसेवा : निघोज-वडनेर रस्त्यावरील पुलाजवळ पुष्पावती नदीकिनारी हॉटेलवाले व चिकण व मटन, मच्छी व्यावसायिक कचरा टाकतात, यामुळे नदीतील पाणी दूषित होत आहे. तसेच ओल्या कचर्‍याची दुर्गंधी सुटते. त्यामुळे स्मशानभूमी परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायतीने बाजारतळ परिसरात घंटागाडीचे नियोजन केले आहे. या घंटागाडीत हा कचरा टाकून लोकांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच चित्रा वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके यांनी केले आहे. हा कचरा घंटागाडीत न टाकता नदीकिनारी टाकल्यास ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

पुष्पावती नदीकिनारी व्यावसायिक कचरा टाकतात. घंटागाडी गावात सातत्याने फिरत असूनही हा प्रकार सुरूच आहे. ग्रामस्थांना याचा नाहक त्रास होतो. यासाठी ग्रामपंचायतीने एक वर्षांपूर्वी 85 लाख रुपयांच्या घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू केले. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, व्यावसायिक दाद देत नाहीत.

स्मशानभूमी सुशोभीकरण करणार

निघोज परिसराची लोकवस्ती मोठी आहे. दशक्रिया विधी व स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र, नदिकिनारी कचरा टाकून काही व्यावसायिक नदीचे पाणी दूषित करण्याचा प्रयत्न सातत्याने करतात.

Back to top button