नगर जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी 98 टक्के मतदान; सहा तालुक्यांची आज मतमोजणी | पुढारी

नगर जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी 98 टक्के मतदान; सहा तालुक्यांची आज मतमोजणी

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील संगमनेर, नगर, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, पारनेर व पाथर्डी या सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी 20 हजार 261 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या सात तालुक्यांत सरासरी 97.98 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तत्काळ राहुरी बाजार समितीची मतमोजणी झाली. उर्वरित सहा बाजार समित्यांची मतमोजणी शनिवारी होणार आहे.

दरम्यान, राहाता, अकोले, श्रीरामपूर, जामखेड, कोपरगाव, नेवासा व शेवगाव या सात बाजार समित्यांसाठी रविवारी मतदान होणार आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. शुक्रवारी सकाळपासूनच मतदानास प्रारंभ झाला. नगर येथील किरकोळ प्रकार वगळता सातही ठिकाणी मतदान शांततेत झाले.

अहमदनगर बाजार समितीसाठी 2 हजार 678 मतदार असून, त्यापैकी 2 हजार 649 मतदारांनी मतदान केले. या तालुक्यात सर्वाधिक 98.92 टक्के मतदान झाले. संगमनेर कृषी बाजार समितीसाठी 3 हजार 623 मतदारांपैकी 3 हजार 510 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीगोंदा बाजार समितीसाठी 3 हजार 240 मतदारांनी मतदान केले. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 2 हजार 764, पारनेरमध्ये 3 हजार 77, कर्जत बाजार समितीसाठी 2 हजार 537 तर पाथर्डी येथील बाजार समितीसाठी 2 हजार 484 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Back to top button