नेवासा, शेवगाव, राहुरी,जामखेडला पुन्हा अवकाळीचा तडाखा | पुढारी

नेवासा, शेवगाव, राहुरी,जामखेडला पुन्हा अवकाळीचा तडाखा

नगर; पुढारी वृत्तसेवा : नेवासा व शेवगाव, राहुरी, जामखेड तालुक्यांत शुक्रवारी दुपारी वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. जामखेड आणि नेवाशात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील नारळाच्या झाडावर वीज कोसळी. वादळी वार्‍यामुळे टपर्‍या उडाल्या असून, विद्युत खांब वाकले गेले.अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती. शुक्रवारी सकाळी नगर शहरासह जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पावसाचे आगमन झाले.

शेवगाव- पाथर्डी रोडवरील टपर्‍यांचे नुकसान झाले. काही विद्युत पोल देखील वाकले गेले. विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने नारळाचे झाडाने पेट घेतला. या पावसामुळे बाजरी, चारा पिके भुईसपाट झाली. नेवाशातील म्हसले येथे कांदा झाकण्यासाठी गेलेल्या साई राजेंद्र शिरसाठ (वय 10) याचा तर जामखेडमधील दिघोळ येथील भीमराव बाजीराव दगडे (वय 65) यांचा वीज पडून मृत्यू झाला. जामखेडमध्ये दोन बैलांचा अवकाळीने बळी घेतला. राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरातही जोरदाव पाऊस पडला.

नेवासा शहर आणि तालुक्यात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने दाणादाण केली. नेवासा शहरात हरभर्‍यासारख्या गारा पडल्या असून, वादळीवार्‍यामुळे काही झाडे पडली. देशपांडे गल्लीतील काझी चौकात झाड पडल्याने वाहतूक काही काळ बंद होती. नेवासा-खुपटी रस्त्यावरील वादळाने चार बाभऴींची झाडे रस्त्यावर आडवी झाली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

खेडले परमानंद परिसरातील काही घरांवरील पत्रे उडाली. त्यामुळे काहींचे संसार उघड्यावर पडले. या पावसाने शिरेगाव, निंभारी, खुपटी, खडका, खलाल पिंप्री, मडकी गावांत कांदा पिकाचे नुकसान झाले. उत्तर जिल्ह्यात वादळ-वार्‍यासह अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. श्रीरामपूर, राहुरी, राहाता, संगमनेर शहरांसह तालुक्यात काल ( शुक्रवारी अवकाळीने तुफान हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांची चांगलीच धावपळ उडाली. पावसासह वादळ-वार्‍याने घरांची पडझड झाल्याने पुन्हा नुकसानीचे सावट समोर आल्याचे दारुण वास्तव समोर येत आहे.

Back to top button